11 August 2020

News Flash

स्थलांतरित पक्ष्यांचे थवे मुंबईतून ठाण्याकडे!

शिवडी-न्हावाशेवा या पुलाच्या बांधकामामुळे स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांना या कामाचा अडथळा होणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

शिवडी-न्हावाशेवा पूल, विमानतळ प्रकल्पामुळे ठाणे खाडीत आश्रय; ठाणे खाडीच्या जैवविविधतेत आणखी भर

किन्नरी जाधव, ठाणे

दरवर्षी हिवाळ्यात उत्तरेकडून स्थलांतर करून मुंबई तसेच नवी मुंबईच्या खाडीपट्टय़ात मुक्कामाला येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांनी यंदा ठाणे खाडीत आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प तसेच नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांमुळे येथील खाडीपट्टय़ात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे फ्लेमिंगोंसह अन्य पाहुण्या पक्ष्यांनी ठाणे खाडीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे खाडीच्या उथळ पात्रात मासे, किडे यांचा मुबलक खुराक मिळत असल्याने भविष्यात स्थलांतरित पक्ष्यांसाठी ठाणे खाडी हेच प्रमुख अधिवासाचे ठिकाण ठरेल, असा दावा ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) केला आहे.

नोव्हेंबर महिना सुरू होताच शिवडीच्या खाडीकिनारी फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांसह रशिया, आफ्रिका येथून अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करतात. या पक्ष्यांना पाहण्यासाठी हौशी छायाचित्रकार, पर्यटक, अभ्यासक मोठय़ा संख्येने गर्दी करतात. त्यामुळे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत शिवडी खाडीकिनारा अक्षरश: जिवंत होऊन जातो. मात्र, या खाडीपट्टय़ात सुरू झालेल्या विकासकामांमुळे गेल्या काही वर्षांपासून स्थलांतरित पक्ष्यांनी अन्यत्र निवारा शोधण्यास सुरुवात केली आहे. शिवडी-न्हावाशेवा या ट्रान्सहार्बर पुलाचे खांब रोवण्यासाठी समुद्रात असलेल्या मजबूत खडकांचा शोध घेण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. या कामामुळे खाडीकिनारी दाखल होणारे पक्षी आपला मोर्चा अन्यत्र वळवतील, असे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.

बांधकाम सुरू झाल्यावर हजारो किमीचा प्रवास करून येणाऱ्या या पक्ष्यांना खाद्यपदार्थाची मुबलकता आणि वास्तव्यासाठी लागणारे पोषक वातावरण उपलब्ध होणार नाही, त्यामुळे शिवडी, न्हावाशेवा किनाऱ्यावरील अनेक पक्षी आपल्या वास्तव्याच्या जागा बदलतील असे निरीक्षण पक्षिप्रेमींकडून नोंदवण्यात येत आहे. यासंबंधी शासनाच्या पुढाकाराने सविस्तर अभ्यास करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीकडूनही या निरीक्षणाला दुजोरा दिला जात असून मुंबईतील सर्वाधिक पक्षी निश्चितच ठाणे, नवी मुंबईतील एनआरआय कॉलनी, पाम बीच मार्गावरील आयएनएस चाणक्यपलीकडील खाडीकिनारा तसेच पांजीकोडी अशा भागात वास्तव्य करतील, असे निरीक्षण बीएनएचएसमधील वरिष्ठ सूत्रांनी नोंदविले आहे. काही वर्षांपासून ठाणे खाडीकिनारा पक्ष्यांसाठी पोषक ठरत असल्याने त्यांचे प्राधान्य ठाणे खाडीला असेल, अशी माहिती देण्यात आली. वाशी, मुलुंडच्या पुलाखाली आजही शेकडो पक्षी पाहायला मिळतात. मात्र पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या कालावधीत हे पक्षी इथले वास्तव्य सोडतील व दुसऱ्या खाडीकिनारी जातील, असे पक्षी निरीक्षक सचिन मैन म्हणाले.

अन्यथा मुंबईला रामराम

फ्लेमिंगो, डक्स, गल्फ, सँडपायपर, रिबर्टन्स, ग्रेटर सँडप्लोवर, लेसर सँडप्लोवर असे पक्षी निश्चितच थव्याने ठाणे खाडीचा पर्याय अवलंबतील, असा अंदाज पक्षी निरीक्षक हिमांशु टेंभेकर यांनी वर्तवला. ‘‘जांभळी पाणकोंबडी या पक्ष्याला गोडय़ा पाण्याची आवश्यकता असते. बांधकामासाठी ही पाण्याची जागा बुजवल्यास हा पक्षी खाऱ्या पाण्याकडे जाऊच शकत नाही. गोडय़ा पाण्याची अन्य जागा शोधेल. ठाणे खाडीचे वास्तव्य ज्यांना सोईस्कर ठरणार नाही, असे पक्षी या खाडीत येणार नाहीत. अन्यथा हे पक्षी मुंबईतील वास्तव्य थांबवतील,’’ असे ते म्हणाले.

शिवडी-न्हावाशेवा या पुलाच्या बांधकामामुळे स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांना या कामाचा अडथळा होणार आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे पक्षी काही वर्षे ठाणे खाडीमध्ये वास्तव्य करतील. गेल्या काही वर्षांपासून ठाणे खाडी खूप उथळ होत चालली आहे. पक्ष्यांसाठी ही खाडी अतिशय सोईस्कर आहे. बांधकाम सुरू झाल्यावर या पक्ष्यांचा प्रवासाचा मार्ग कोणता असेल, कोणते पक्षी कुठे जातील याचा अभ्यास सिडको आणि एमएमआरडीएबरोबर सुरू आहे.

– डॉ. दीपक आपटे, संचालक – बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 3:54 am

Web Title: migratory birds moved from mumbai to thane
Next Stories
1 सेना-भाजप नेत्यांना आयुक्तांचा दणका?
2 जैववैद्यकीय कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीचा मार्ग मोकळा!
3 छटपूजेनंतर जलप्रदूषण
Just Now!
X