18 January 2019

News Flash

मातेच्या दुधाला पारखे झालेल्या नवजात बालकांना वरदान

मातृदुग्ध पेढय़ांद्वारे दुधाचे वाटप; ठाण्यात ‘यशोदामाई’ गट कार्यरत 

|| शलाका सरफरे

मातृदुग्ध पेढय़ांद्वारे दुधाचे वाटप; ठाण्यात ‘यशोदामाई’ गट कार्यरत 

जगात आईच्या दुधाला पर्याय नाही. मातेचे दूध न मिळाल्याने वर्षभरात जगभरात सुमारे १३ लाख नवजात बालके मृत्युमुखी पडतात. मातृदुधाअभावी होणारी ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी महाराष्ट्रातही आता मातृदुग्ध संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. ठाण्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘यशोदामाई’ नावाचा एक गट गेली काही महिने कार्यरत आहे. या उपक्रमात गेल्या तीन महिन्यांत १३ लिटर दूध संकलित होऊन गरजूंना देण्यात आले. बाळंतिणीचे अतिरिक्त दुध संकलित करून गरजू नवजात बालकांना दिल्यास त्यासाठी ते वरदान ठरत असल्याने या चळवळीचा आता प्रसार होऊ लागला आहे.

मातेचे आजारपण, बाळंतपणात झालेला मृत्यू अथवा अन्य कोणत्याही कारणाने नवजात बालके त्यांना पोषणासाठी आवश्यक असलेल्या मातृदुधापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत दुसऱ्या बाळंतिणीने दिलेले दूध या मुलांना दिले तर त्यांचा फायदा होऊ शकतो. तापवून अथवा थंड करून हे दूध काही काळ साठवून आवश्यकतेनुसार देता येते.

ठाण्यातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘यशोदामाई’ हा साहाय्यक गट तयार करण्यात आला. ठाण्यातील ‘मैत्रीण’ या स्वयंसेवी संस्थेच्या महिलांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. डॉ. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला बाळंतिणींना मातृदुधाचे महत्त्व पटवून देतात. सुदृढ बाळंतीण या उपक्रमात दूध देऊ शकते, मात्र हा विषय आपल्याकडे नवा असल्याने मोठय़ा प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम ठाण्यात सुरू असून त्याची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. संध्या खडसे यांनी सांगितले.

भारतात सध्या १३ हून अधिक मातृदुग्धपेढय़ा आहेत. त्यांपैकी मुंबईमध्ये जे.जे.रुग्णालय, सायन रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, नायर रुग्णालय, छ.शिवाजी महाराज रुग्णालय यांचा समावेश आहे. मातृदुग्धपेढीत मातृदुधाचे संकलन, तपासणी, प्रक्रिया, साठवण आणि वाटप केले जाते. संकलित झालेले दूध गरजू आणि कमजोर बालकांसाठी वापरले जाते.

संकलन होते कसे?

एड्स, कावीळ, इतर संसर्गजन्य रोग नसलेल्या निरोगी मातांचे अतिरिक्त दूध (सरप्लस मिल्क) पेढीसाठी घेतले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेस्ट पंपाच्या साहाय्याने दूध काढले जाते. वेदनारहित आणि सुरक्षित पद्धतीने काढलेल्या या दुधाला संसर्गाचा धोका नसतो. पाश्चरायझर यंत्रात मातेचे दूध संकलित केले जाते. ६२.५ डिग्री सेल्सिअस अंशाला तापवून हे दूध साठवले जाते. यामुळे दुधातील प्रोटीन व इतर जीवनसत्त्वे सुरक्षित राहतात. दूध तापवल्यानंतर त्यात अपायकारक जिवाणू व इतर जंतू असू नयेत म्हणून हे दूध सूक्ष्मजीवशास्त्र विभागातून तपासून घेतात. शीतपेटीमध्ये संकलित केलेल्या दुधाचा पुरेपूर लाभ मिळण्यासाठी काढल्यापासून ९६ तासांत बाळाला मिळणे गरजेचे असते. तसेच उणे २० तापमानाला सहा महिन्यांपर्यंत हे दूध साठवता येते.

बालमृत्यू रोखणे शक्य

भारतात दर हजार नवजात बाळांपैकी ४३च्या आसपास बाळांचा मृत्यू जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यात होतो, हे मृत्यू कमी करण्यासाठी मानवी दूधपेढय़ा उपयोगी ठरणार आहेत.

फायदा कोणाला?

  • आजारपण, कमी वजन, बाळंतपणातील अडचणी, दुर्धर रोग आदींमुळे मातांना दूध नसते वा अपुरे दूध येते.
  • प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेल्या मातांच्या बाळांना किंवा अपुऱ्या दिवसांच्या बाळांना आईचे दूध मिळत नाही.
  • जुळं, तिळं होणाऱ्या मातांना दूध कमी पडते.
  • किरकोळ शरीरयष्टी, अशक्त प्रकृती, सपाट स्तन, स्तनाग्रांमधले दोष आदी कारणांमुळे काही मातांना पुरेसे दूध येत नाही.

First Published on May 13, 2018 1:33 am

Web Title: milk distribution at international mothers day 2018