प्रतिदिन पाच लाख लिटर साठवणूक क्षमता

भिवंडी येथील पिंपळगाव परिसरातील दुग्धविकास विभागाची जागा मदर डेअरी कंपनीला नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या निर्णयानुसार जागेच्या हस्तांतरण करारावर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे संबंधित जागेवर मदर डेअरीला प्रतिदिन पाच लाख लिटर क्षमतेचा दूध प्रकल्प उभारणे शक्य होणार आहे.

भिवंडी तालुक्यातील पिंपळगावमधील गोवे गावात दुग्धविकास विभागाची सुमारे सात हेक्टर जागा आहे. ही जागा मदर डेअरीला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र जागा हस्तांतरणासंबंधीचा करार केला नव्हता. दरम्यान, सोमवारी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या प्रकल्पाची आढावा बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, पशुसंवर्धन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मदर डेअरीला देण्यात येणाऱ्या जागेच्या हस्तांतरण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

प्रकल्प असा

गोवे गावातील सात हेक्टर जागा मदर डेअरीला नाममात्र म्हणजेच एक रुपये दर वर्षांला या भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. या जागेचा करार तीस वर्षांसाठी करण्यात आला आहे. या ठिकाणी मदर डेअरीकडून प्रतिदिन पाच लाख लिटर क्षमतेचा दूध प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय, दूध आणि दुधाशी संबंधित पदार्थही उत्पादित करणार आहे.