वितरकांना चलनकल्लोळाचा फटका

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांच्या बंदीचा फटका दूधविक्रेत्यांना बसला असून शुक्रवारपासून (१८ नोव्हें.) या विक्रेत्यांना दूधपुरवठा करण्यास मोठे व्यापारी आणि कंपन्यांनी नकार दिल्यामुळे छोटय़ा दूधविक्रेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी ठाण्याच्या घरोघरी पोहोचवले जाणारे दूध बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली असून संतप्त दूधविक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन आपली व्यथा मांडली आहे. मोठे व्यापारी आणि कंपन्यांच्या आडमुठेपणामुळे ही दूधकोंडी निर्माण झाली असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप केला आहे. ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने या विषयी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी साकडे घालण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशभरातील व्यवहार मंदावले आहेत. मोठय़ा वितरकाकडून दूध खरेदीकरून छोटे वितरक ते दुकानांपर्यंत पोहोचवतात आणि यानंतर ते दूध घरोघरी पोहोचवले जाते. पण केंद्राने पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द केल्याने मोठय़ा वितरकांनीही या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. यापुढे नवीन नोटाच स्वीकारू असा पवित्रा मोठय़ा वितरकांनी घेतला आहे.

नागरिकांकडे सध्या जुन्या नोटा असल्यामुळे दुधाचे बिल या जुन्या नोटांमधून मिळत असून ते स्वीकारण्यास मोठे व्यापारी आडमुठेपणा करीत आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून होणारे दूध वितरण शुक्रवारी थांबणार असल्याचे या संदर्भात गोकुळ, महानंद आणि अमुल या दूध वितरण कंपन्यांच्या वितरकांकडून कळवण्यात आले आहे.  दिनेश घाडगे, उपाध्यक्ष, ठाणे दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्था