दूध उत्पादकांचा संप कायम राहिल्यास ठाणेकरांसमोर पेचप्रसंग

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा कोणताही परिणाम मंगळवापर्यंत ठाणे शहरात दिसून आलेला नाही. हे आंदोलन जाहीर होताच ग्राहक आणि दुकानदारांनी दुधाचा अतिरिक्त साठा करून ठेवल्याने मंगळवारीही शहरात कोठेही दूधटंचाई जाणवली नाही; परंतु संप आणखी दोन दिवस सुरू राहिल्यास ठाणेकरांची दूधकोंडी होण्याची शक्यता दूध विक्रेता संघटनेने व्यक्त केली आहे.

दूध उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळल्यावर संघटनेच्या आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी स्वाभिमानी संघटनेतर्फे आंदोलन जाहीर केल्यावर दूध वितरित करताना विक्रेत्यांची तारांबळ होत असल्याचे चित्र निदर्शनास आले. मात्र या आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी ठाणे शहरात फारसा परिणाम झालेला नाही. ठाणे जिल्ह्य़ात दररोज साडेपाच ते सहा लाख लिटर एवढा दुधाचा पुरवठा होत असतो. यापैकी शहरी भागात दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाची आवक होत असते. पहाटे ग्राहकांना दूध वितरित करण्यासाठी रात्री दूध विक्रेत्यांना कंपनीकडे मागणी नोंदवावी लागते. यात दूध विक्रेते अतिरिक्त दुधाची मागणी करीत असल्याने कठीण परिस्थितीत विक्रेत्यांकडे दुधाचा साठा असतो. सोमवारी जाहीर केलेल्या या आंदोलनामुळे दुसऱ्या दिवशी दूधपुरवठय़ावर फारसा परिणाम जाणवला नाही. दररोज दूध पुरवणाऱ्या टँकरपैकी चार टँकर दाखल झाले नसल्याने ८० टक्के दुधाचा पुरवठा झाला होता. त्यामुळे बाजारात दूधटंचाई जाणवली नाही. या संपाचा परिणाम सहकारी संस्थेच्या दूधपुरवठय़ावर परिणाम झाला नसून खासगी संस्थांकडून पुरवठा कमी झाला आहे, असे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेकडून सांगण्यात आले.

दूध उत्पादकांचा संप कायम राहिल्यास मात्र दूधटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. संपाच्या अनिश्चिततेमुळे नागरिकांनी दोन दिवस अतिरिक्त दूध खरेदी केले. मंगळवारी दुपारनंतर मात्र ग्राहकांना एक लिटरपेक्षा अधिक दूध देण्यास दुकानदार नकार देत होते.

संपाच्या पाश्र्वभूमीवर दूध विक्रेत्यांकडून जास्त पैसे आकारणी होत असल्यास नागरिकांनी ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेकडे त्वरित तक्रार दाखल करावी. जास्त पैसे आकारून दूधविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल.    – पांडुरंग चोडणेकर, उपसचिव, ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्था