ठाण्यातील आवक ३५ टक्क्यांनी घसरली

राज्यभरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसू लागला असून ठाण्यात तीव्र दूधटंचाई निर्माण झाली आहे. वाशी आणि पुण्याहून ठाणे शहराला होणारी दुधाची आवक शुक्रवारी तब्बल ३५ टक्क्यांनी घटल्याचा दावा दूधवितरक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शहरात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच अनेक ग्राहक घरात साठा करून ठेवण्यासाठी दैनंदिन गरजेपेक्षा अधिक दूधखरेदी करीत असल्याने पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नामांकित कंपन्यांचा दूधपुरवठा सुरळीत सुरू असला तरी गोदावरी, संस्कृती अशा विदर्भातून ठाण्याच्या दूध बाजारात केला जाणारा पुरवठा बंदच झाल्याने दुधाचा तुटवडा जाणवल्याची माहिती ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने दिली. ठाणे शहरात दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाची आवक होत असते. यामध्ये गोकूळ या नामांकित कंपनीचे ७५००० लिटर दूध, वारणा कंपनीचे २५००० लिटर, अमूल कंपनीचे ५०,००० लिटर दूध बाजारात येत असते.  इतर कंपन्यांमार्फत होणारा उर्वरित दुधाचा पुरवठा असे एकूण अडीच लाख लिटर दूध ठाण्याच्या बाजारात दाखल होत असते. शुक्रवारी मात्र विदर्भातून येणाऱ्या गोदावरी, संस्कृती अशा दुधाचा पुरवठाच ठाणे शहरात होऊ शकला नाही.

पहाटे ग्राहकांना दूध वितरित करण्यासाठी रात्री दूध विक्रेत्यांना कंपनीकडे मागणी नोंदवावी लागते. दोन दिवस सुरू असलेल्या संपाच्या पाश्र्वभूमीवर दूध व्यावसायिकांनी नामांकित कंपन्यांकडे अतिरिक्त दुधाची मागणी केली असली तरी या कंपन्यांकडूनही अतिरिक्त दुधाचा पुरवठा नाकारण्यात आला आहे.

दुधाचे रेशनिंग’?

संपाच्या अनिश्चिततेमुळे साशंक असणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी आणि शुक्रवारी अतिरिक्त दुधाची खरेदी केली. वाढीव खरेदीमुळे दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याचे वितरकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काळात संपावर तोडगा निघाला नाही तर एका खरेदीदाराला ठरावीक दूध विक्री करण्यासंबंधी धोरण ठरविले जात असल्याचे वितरण संघटनेतील सूत्रांनी स्पष्ट केले.