ठाणे शहरात दूधपुरवठा न करण्याचा इशारा

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीतून किराणा माल, दूध, भाजीपाला, औषधालये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आले असले तरी दूध विक्रेत्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. अशाचप्रकारे कळवा पोलिसांनी दोन दूध विक्रेत्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले असून ठाण्यात काही ठिकाणी दूध विक्रेत्यांना पोलिसांनी मारहाण केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या दूध विक्रेत्यांनी अदखलपात्र गुन्हे मागे घ्या अन्यथा दूध पुरवठा बंद करू असा इशारा दिला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीमधून दूध, किराणामाल, भाजीपाला आणि औषधालये वगळण्यात आले आहेत. ही सुविधा संचारबंदीच्या काळातही सुरूच राहणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. तरीही कळवा येथील दोन दूध विक्रेत्यांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचबरोबर वसंतविहार येथील दूध विक्रेत्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप दूध वितरक संघटनांनी केला आहे.  कळवा येथील ९० फूट रस्ता आणि मनीषानगर भागात मंगळवारी सकाळी ६ वाजता सुधाकर एकसिंगे (५५) आणि संतोष पवार (४४) हे दोघे दूध विक्री करीत होते. या दोघांकडे दूध खरेदीसाठी नागरिकांनी  गर्दी केल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यांना पुढील कारवाईसाठी २६ मार्चला सकाळी ११ वाजता ठाणे न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच ठाणे शहरातील वंसत विहार भागातही असाच प्रकार घडला. वसंत विहार परिसरात नागरिकांनी दूध खरेदीसाठी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन विक्रेत्याला मारहाण केली, अशी माहिती ठाणे दुध वितरण संघटेनेचे सदस्य तसेच महानंदा आणि गोकुळ दुधचे मुख्य वितरक कृष्णा पाटील यांनी दिली. नवी मुंबईतील दिघा येथेही एका दूध विक्रेत्याला मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे दूध विक्रेते संतप्त झाले आहेत. अदखलपात्र गुन्हे मागे घेतले नाहीतर दुध विक्री बंद करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे. त्यांनी दुध बंद ठेवले तर शहरात दुधाचे वितरण होणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

स्वराज्य इंडिया संघटनेचे ठाणे पोलिसांना पत्र

राज्यात लागू केलेल्या संचारबंदीतून जीवनावश्यक वस्तू, दूध, अन्नधान्ये, भाजी आणि औषधांची दूकाने वगळण्यात आली असून ती खुली राहणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. तरीही ठाणे शहरात औषध दुकाने वगळता दूध, अन्नधान्ये, भाजीची दुकाने पोलीस बंद करीत आहेत, असा आरोप स्वराज इंडिया संघटनेने केला असून यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये एखाद्या ठिकाणी गर्दी होत असेल तर हस्तक्षेप करणे किंवा गर्दी कमी करणे यास कुणाचाही आक्षेप नाही. परंतु विक्रेत्यांना हटविणे योग्य नाही. पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळ आणि सायंकाळी वेळा निश्चित करून त्यांच्यामध्ये योग्य अंतर ठेवून विविध ठिकाणी याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे पत्रात म्हटले आहे.