तीन सभापतींच्या संपत्तीत ९ कोटी ५१ लाखांची वाढ
स्थायी समिती म्हणजे पालिकेची तिजोरी असते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती ठेवण्यात मागील पाच वर्षांत शिवसेनेला यश आले. युतीचे राजकारण असले तरी पाचही वर्षांत सभापती मात्र शिवसेनेचे झाले. इयत्ता चौथी ते सातवीपर्यंत शिक्षण असलेले पण बांधकाम व्यवसायात तेजीत असलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समितीचे मागील पाच वर्षांतील पाच सभापती कोटय़धीश बनले आहेत. यापैकी तीन सभापतींच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत एकूण ९ कोटी ५१ लाख १९ हजार ९५० रुपयांची वाढ झाली आहे.
महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचा स्थायी समिती सभापती अशी अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. तीच परंपरा शिवसेनेने कल्याण-डोंबिवली पालिकेत जपली. सत्तेतील भागीदारीत भाजप असूनही शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत भाजपला स्थायी समितीच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या नाहीत. मागील पाच वर्षांत शिवसेनेचे नगरसेवक जनार्दन म्हात्रे, प्रकाश पेणकर, मल्लेश शेट्टी, दीपेश म्हात्रे आणि मागील सहा महिने रमेश सुक ऱ्या म्हात्रे हे स्थायी समितीचे सभापती होते. हे सर्व सभापती मागील काही वर्षांपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरत आहेत.
या नगरसेवकांनी पाच वर्षांपूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्तीचे विवरण जाहीर केले होते. गेल्या पाच वर्षांत या नगरसेवकांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. या सभापतींमध्ये मल्लेश शेट्टी, प्रकाश पेणकर आणि दीपेश म्हात्रे यांचा समावेश आहे. रमेश सुक ऱ्या म्हात्रे यांची मागील पाच वर्षांतील संपत्ती जैसे थे आहे. जनार्दन म्हात्रे यावेळी निवडणूक लढवत नसल्याने त्यांच्या वाढीव संपत्तीबाबत माहिती मिळू शकली नाही.

मल्लेश शेट्टी
कल्याण पूर्वमधील लोकग्राम प्रभाग क्रमांक ४२ या मतदारसंघातून मल्लेश शेट्टी (५०) शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. बेकायदा बांधकामप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची नोटीस पालिका आयुक्तांनी त्यांना बजावली आहे. इयत्ता सातवी शिकलेल्या मल्लेश यांच्याकडे आठ लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये मल्लेश, त्यांची पत्नी नेहा यांची एकत्रित स्थावर, जंगम, रोख संपत्ती २ कोटी २६ लाख २० हजार ७ रुपये होती. यावेळी ऑक्टोबर २०१५ मधील महापालिकेची निवडणूक लढवताना मल्लेश यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती ६ कोटी ८१ लाख २५ हजार ६९० रुपये असल्याचे म्हटले आहे. म्हणजे मागील पाच वर्षांत ४ कोटी ८५ लाख ५ हजार ६८३ रुपयांची वाढ झाली आहे.

रमेश म्हात्रे
रमेश सुकऱ्या म्हात्रे यांची एकूण संपत्ती पाच वर्षांपूर्वी ५ कोटी ३५ लाख ६८ हजार ७०५ रुपये होती. यावेळी ती ४ कोटी ६ लाख ६३ हजार ३१६ दाखवण्यात आली आहे. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर आहे. चौथी शिकलेल्या जनार्दन म्हात्रे यांची पाच वर्षांपूर्वी संपत्ती १ कोटी ५५ लाख ६८ हजार ९९७ रुपये आहे. रमेश, जनार्दन म्हात्रे यांची अनेक विकासक संस्थेत भागीदारी आहे.

प्रकाश पेणकर
अपक्ष म्हणून निवडून येऊन शिवसेनेचा झेंडा नेहमीच खांद्यावर ठेवणारे नगरसेवक प्रकाश पेणकर हेही स्थायी समितीचे सभापती होते. ते इयत्ता आठवी शिकले आहेत. ऑक्टोबर २०१० मध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पेणकर यांनी आपली स्थावर, जंगम, ऐवजासह एकूण संपत्ती ५७ लाख ७३ हजार ८६५ रुपये असल्याचे म्हटले होते. ऑक्टोबर २०१५ची पालिका निवडणूक लढवताना प्रकाश पेणकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती ४ कोटी ६८ लाख २४ हजार ६५६ असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच पेणकर यांच्या संपत्तीत तब्बल ३ कोटी ९३ लाख ४१ हजार ६९० रुपयांची वाढ झाली आहे.

दीपेश पुंडलिक म्हात्रे
शिवसेना उपजिल्हाप्रमुख, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांचे चिरंजीव दीपेश म्हात्रे (३१) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये दीपेश यांनी उमेदवारी अर्ज भरताना स्वत:च्या संपत्तीचे विवरणपत्र भरले होते. यामध्ये त्यांची एकूण स्थावर, जंगमसह मालमत्ता ३९ लाख ६० हजार ३४ रुपये होती. यावेळच्या पालिका निवडणुकीत दीपेश यांनी उमेदवारी अर्जासोबत भरलेल्या विवरणपत्रात त्यांची एकूण मालमत्ता १ कोटी १२ लाख ३२ हजार ६११ रुपये असल्याचे म्हटले आहे. म्हणजे मागील पाच वर्षांत दीपशे यांच्या मालमत्तेत ७२ लाख ७२ हजार ५७७ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांनी मागील वर्षी एक लाख रुपयांचा प्राप्तिकर भरणा केला आहे.