भाईंदर : काशीमिरा येथील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जलवाहिनी तुटल्याने  मोठय़ा प्रमाणात लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. सध्या शहरात पाणीटंचाई  असताना असे पाणी वाहून गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठय़ात एमआयडीसीकडून गेल्या महिन्याभरापासून पाणीकपात करण्यात  येत आहे. त्यामुळे शहरात  गंभीर प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत काशीमिरा येथील राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या जलवाहिनीला तडे गेल्याने सलग तीन ते चार तास लाखो लीटर पाणी वाया गेले. इतक्या मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तर पाण्याची गरज अधिक असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून चक्क पाणी भरून घरी घेऊन  जाण्यास सुरुवात झाली.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास  या मार्गावर उभे असलेले अवजड वाहन उलटल्याने रस्त्यावरील जलवाहिनी तुटली गेली. तर या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आल्यानंतरही  तीन तासापर्यंत पालिकेची कोणतीही यंत्रणा घटनास्थळील आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याच वेळी याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.