26 February 2021

News Flash

‘फेसबुक मित्रा’कडून लाखोंची फसवणूक

फसवणूक झालेल्या महिलेने या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भाईंदरमधील महिलेची तरुणाविरोधात तक्रार; साडेआठ लाखांचा गंडा

‘फेसबुक’ या समाजमाध्यमाद्वारे अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे किती महाग पडू शकते याचा प्रत्यय काशिमीरा येथील एक ३४ वर्षीय महिलेला आला. फेसबुकवरून मैत्री, चॅटिंग, एकमेकांचा मोबाइल क्रमांक देणे, गप्पा, एकमेकांचा विश्वास संपादन करणे आणि या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तब्बल साडेआठ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सॉलोमन जॅक नावाच्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत. फसवणूक झालेल्या महिलेने या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या महिलेची सॉलोमन जॅक या तरुणाशी गेल्या वर्षी मे महिन्यात फेसबुकवर ओळख झाली. स्वत:ची ओळख सॉलोमनने स्कॉटलंडचा नागरिक अशी करून दिली. एक ऑटोमोबाइल कंपनीत व्यवस्थापक असणाऱ्या सॉलोमनने या महिलेचा चांगलाच विश्वास संपादन केला. सातत्याने चॅटिंग केल्यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाइल क्रमांक दिले. मोबाइल आणि फेसबुकद्वारे सातत्याने संपर्कात राहिलेल्या दोघांची चांगलीच मैत्री झाली. काही दिवसांनी सॉलोमनने या महिलेला एक महागडी भेटवस्तू द्यायची असल्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर महिन्याभरातच मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या एका महिलेने तक्रारदार महिलेला फोन केला. तुमच्यासाठी एक पार्सल आले असून त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याचे या महिलेने सांगितले. तक्रारदार महिलेने सॉलोमनशी संपर्क साधला असता त्याने ही भेटवस्तू अत्यंत मौल्यवान असल्याने ती शुल्क भरून घेण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिलेने या शुल्कापोटी विविध बँक खात्यांत सुमारे ८ लाख २० हजार रुपये हस्तांतर केले, परंतु सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या महिलेने पुन्हा फोन करून आणखी ३ लाख ९२ हजार रुपये भरणे आवश्यक असल्याचे तक्रारदार महिलेला सांगितले. मात्र एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे महिलेने स्पष्ट केले.

आठवडाभरापूर्वीच सॉलोमनने स्वत:च फोन करून आपण दिल्लीला आलो असल्याचे सांगितले. आपले सामान अधिकाऱ्यांनी अडवून ठेवले असल्याने आपल्याला पैशांची गरज असल्याचे सॉलोमनने तक्रारदार महिलेला सांगितले. त्यामुळे या महिलेने पुन्हा ४१ हजार रुपये त्याला पाठवण्याची व्यवस्था केली, परंतु सॉलोमनची पैशांची मागणी थांबत नसल्याने महिलेला संशय आला आणि तिने काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून महिलेने पैसे भरलेल्या बँक खात्यांची तपासणी सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:21 am

Web Title: millions of fraud by facebook friend
Next Stories
1 रिक्षा तंदुरुस्त चाचणीसाठी नेरूळवारी
2 कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे आंदोलन
3 शहरबात : शिवसेनेचे  सामाजिक अभिसरण
Just Now!
X