23 November 2020

News Flash

नाटय़गृहाचे ग्रहण सुटेना!

नव्या ठाण्यात अर्थात घोडबंदर भागात महापालिकेने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह उभारले आहे.

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी घाणेकर नाटय़गृहाच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली.      (छायाचित्र : दीपक जोशी)

ठाण्यातील घाणेकर नाटय़गृहातील ‘मिनी थिएटर’ वर्षभरानंतरही बंदच; १० नोव्हेंबरपूर्वी कार्यक्रमांसाठी खुले करण्याचे महापौरांचे आदेश

स्थानिक कलावंतांसह व्यावसायिक नाटय़कर्मीना सराव करता यावा, तसेच छोटय़ा स्वरूपाच्या कार्यक्रमांना व्यासपीठ मिळावे, यासाठी घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेले डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहातील ‘मिनी थिएटर’ (लघू प्रेक्षागृह) गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे. त्यामुळे ठाण्यातील नाटय़वर्तुळात तीव्र नाराजी असून रसिक प्रेक्षकांचाही विरस होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी या नाटय़गृहाच्या दुरुस्तीकामाची पाहणी करणाऱ्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांना फैलावर घेतले. तसेच येत्या १० नोव्हेंबपर्यंत कोणत्याही परिस्थितीत नाटय़गृह खुले करण्याचे आदेश त्यांनी दिले.

नव्या ठाण्यात अर्थात घोडबंदर भागात महापालिकेने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह उभारले आहे. स्थानिक कलावंतांसाठी हे प्रेक्षागृह हक्काचे ठिकाण होते. व्यावसायिक तसेच प्रायोगिक रंगकर्मी या मिनी प्रेक्षागृहाचा तालिमीसाठीही वापर करत. शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांचे कार्यक्रमही या ठिकाणी होत असत. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे प्रेक्षागृह दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे रंगकर्मी, आयोजक, विविध संस्थांमधून नाराजीचा सूर उमटत असून या प्रेक्षागृहातील दुरुस्तीचे काम पूर्ण होणार कधी, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नाटय़गृहाचा पाहणी दौरा करून तेथील दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच कामातील दिरंगाईबद्दल त्यांनी अधिकारी, ठेकेदाराला फैलावर घेतले. गेल्या वर्षभरात कोणती दुरुस्तीची कामे करत होतात, असा प्रश्न त्यांनी अधिकारी व ठेकेदाराला विचारला. या कामास उशीर होत असल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत माहिती का पोहचवली नाही, असे सांगत त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्याचबरोबर येत्या १० नोव्हेंबपर्यंत नाटय़गृह कोणत्याही परिस्थिती खुले करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची सूचनाही बेदखल

लघु प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल ७२ लाख नऊ हजार रुपयांचा ठेका दिला आहे. हे काम सुरू केल्यापासून प्रेक्षागृहातील पाण्याची गळती थांबविणे तसेच लघु प्रेक्षागृहातून मुख्य प्रेक्षागृहात परावर्तित होणाऱ्या आवाजाचे मूळ शोधणे अशी कामे पूर्ण करण्यात आली आहे. मध्यंतरी याप्रकरणी ठाण्यातील काही नाटय़प्रेमींनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार तावडे यांनी हे निवेदन महापालिकेस पाठविले होते. त्यावर मे महिन्याच्या अखेरीस हे लघु नाटय़गृह सुरू केले जाईल, असा खुलासा अभियंता विभागाने केला होता. ही मुदत केव्हाच टळली आहे.

कलाकारांतूनही नाराजी

नाटय़गृहातील तांत्रिक बाबींचे काम सुरू असून येत्या एक ते दीड महिन्यात नाटय़गृह सुरू होईल. तसेच मध्यंतरी हे नाटय़गृह दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले होते, असा दावा नाटय़गृहाचे व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण यांनी केला आहे. तर एकही दिवस नाटय़गृह खुले करण्यात आलेले नसल्याचा दावा दिग्दर्शक विजू माने यांनी केला आहे. ऑगस्ट महिन्यात नाटय़गृह खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऑक्टोबर महिना उजाडला तरी नाटय़गृह खुले होऊ शकलेले नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. १० नोव्हेंबरला नाटय़गृह खुले न झाल्यास या ठिकाणी असेल त्या अवस्थेत दिवाळी पहाटचा कार्यक्रम विनामूल्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 2:04 am

Web Title: mini theater in the ghanekar theater is closed after one year
Next Stories
1 अपघातानंतरही रेल्वेप्रवाशांचा प्रवास खडतर!
2 ‘गुणिजन’ निवडीत महापौर एकाकी?
3 ठाण्यात इमारत खचली
Just Now!
X