रुग्णवाढीमुळे ठाण्याची नाचक्की होत असल्याची टीका

ठाणे : करोनाचा संसर्ग रोखण्यात येत असलेले अपयश, प्रतिबंधित क्षेत्रांतही वाढती रुग्णसंख्या, खासगी रुग्णालयांविषयीच्या वाढत्या तक्रारी आणि अजब प्रशासकीय फतवे यांमुळे टीकेचे धनी ठरत असलेल्या ठाणे महापालिका प्रशासनावर सोमवारी मंत्र्यांनीही आगपाखड केली. ‘धारावीसारख्या झोपडपट्टीतील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबईतील अधिकारी जिवाचे रान करत असताना तुमच्या गलथान कारभारामुळे ठाण्याची नाचक्की होत आहे,’ अशा शब्दांत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद आव्हाड यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावल्याचे समजते.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित सापडले असून ठाणे शहरात दररोज सरासरी १०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. ठाणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात करोनाचा सर्वाधिक संसर्ग वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री िशदे आणि मंत्री आव्हाड यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात घेतलेली बैठक वादळी ठरली. या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी आयुक्तांसमक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शहरातील झोपडपट्टी परिसरात साथ नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाय आखण्यात तुम्हाला अपयश आले असून खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप कधी लावणार असा सवाल या वेळी या मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित केला. धारावीत साथ नियंत्रण आणण्यात अधिकाऱ्यांना यश आले. येथे मात्र कुणाचा पायपोस कुणात नाही अशा शब्दांत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महापालिकेत दोन नवे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय शासनाने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती शहरात केली आहे. असे असतानाही साथ रोखण्यात अपयश येत असल्याबद्दल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.