ठाणे : उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक पाच परिसरात ११ वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी घडला. हर्ष आल्हाट (११) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील गणेशनगर परिसरात हर्ष आल्हाट हा आपल्या आईसोबत राहत होता. उल्हासनगर येथील एका कपडय़ाच्या कारखान्यात हर्षची आई काम करते. सोमवारी रात्री हर्ष आपल्या लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी हर्ष परत आला नसल्याने त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. दरम्यान, हर्षची आई काम करत असलेल्या कपडय़ाच्या कारखान्याच्या शेजारी भाडय़ाने राहत असलेल्या जाकीर मोहम्मद अन्सारी याच्या खोलीमध्ये हर्षचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी हर्षची हत्या झालेल्या घरात राहणाऱ्या चार व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही व्यक्ती फरार असून पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत.