मुलीच्या शोधासाठी पित्याचा सहा वर्षांपासून संघर्ष

या ईदला तरी आपली मुलगी मुस्कान घरी परतेल या आशेवर वांद्रे येथील खान कुटुंबीय डोळे लावून बसले आहेत. मुस्कान बेपत्ता होऊन सहा र्वष लोटली आहेत. ईदच्या दिवशीच तिचे अपहरण झाले होते. कधी कुठून तरी फोन येईल मुस्कानची माहिती मिळेल, अशी त्यांना आशा आहे. गेल्या सहा वर्षांपासून मुस्कानचे वडील तिच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत.

वांद्रे येथे राहणाऱ्या कमर आलम खान यांचा पत्नी आणि तीन मुलांचा सुखी संसार होता. वेल्डिंगचे काम करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. ११ सप्टेंबर २०१० रोजी ईदच्या दिवशी ते नालासोपारा येथे आले होते. नमाज पडून ते घरी परतत होते. त्या वेळी घराबाहेर खेळत असलेल्या मुस्कानला कुणीतरी पळवून नेले होते. मुस्कान तेव्हा ६ वर्षांची होती. तेव्हापासून ते मुलीच्या शोधासाठी वेडेपिसे झाले आहेत.

मुलीच्या शोधासाठी खान यांनी केलेले प्रयत्न थक्क करणारे आहेत. त्यांनी स्वत: मुलीची शोधमोहीम हाती घेतली. महाराष्ट्र आणि गुजरातचे सर्व जिल्हे पालथे घातले. देशातल्या प्रमुख रेल्वे स्थानकात पोस्टर लावून मुस्कानबाबत माहिती देण्याचे आवाहन केले. सगळी अनाथाश्रमे, बालगृह पालथी घालत आहेत. मुस्कानच्या शोधासाठी त्यांनी फेसबुक पेजही सुरू केले आहे. पण अद्याप मुस्कानचा पत्ता लागलेला नाही.

कमर आलम खान यांनी मुस्कानच्या शोधासाठी चार मोबाइल क्रमांक दिले आहेत. हे चारही मोबाइल ते जवळ बाळगतात. जर कधी अध्र्या रात्री फोन वाजला, तरी ते आशेने फोन घेतात.

आता त्यांना येणारे फोन कमी झाले आहेत. चार महिन्यांपूर्वी एका फोन करणाऱ्या व्यक्तीने मुस्कान मध्य प्रदेशातील एका आश्रमात दिसल्याचे सांगितले होते. खान तेथेही जाऊन आले, परंतु पदरी निराशाच पडली.

पोलिसांची हलगर्जी नडली

मुस्कानला जेव्हा घराबाहेरून पळवून नेले, तेव्हा लगेच खान यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी केवळ बेपत्ता अशी नोंद केली होती. कुणी तुमच्या मुलीला आणून दिले, तर आम्ही कळवू, असे उत्तर दिले होते. तब्बल नऊ महिने पोलीस टोलवाटोलवी करत होते. पोलिसांनी जर वेळीच प्रयत्न केले असते, तर ही वेळ आली नसती, असे खान यांनी सांगितले.