दोन अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या वेगवेगळ्या घटना दिवा आणि मुंब्य्रात उघडकीस आल्या आहेत. दोन्ही पीडित मुली गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीला धमकावून तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार शनिवारी दिव्यात उघड झाला. जितेंद्र सोनावणे ऊर्फ बाला (१९) असे या तरुणाचे नाव असून, पोलीसांनी त्याला शनिवारी रात्री अटक केली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दिवा पूर्व परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला जितेंद्र हा धमकावून तिच्यावर बलात्कार करीत होता. डिसेंबर २०१५ पासून जानेवारी २०१६ या काळात तिला निर्जनस्थळी नेऊन तो हे कृत्य करीत होता. ही मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचेही तपासात पुढे आले आहे.
दुसऱ्या घटनेत आईला ठार मारण्याची धमकी देत नासिर शेख ऊर्फ जब्बार इसुद्दीन शेख (२८) या तरुणाने एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंब्य्रात उघडकीस आला. मुंब्य्रातील रेतीबंदर येथील चाळीमध्ये पीडित मुलगी राहात असून ती सहावीत शिकत होती.
नासिर शेख हा वर्षभरापासून तिला धमकावून तिच्यावर बलात्कार करीत होता. आरोपीने या मुलीला रेतीबंदर चाळ, मुंब्रा, वाशी, डोंबिवली आणि कल्याण या भागांमध्ये नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचेही वैद्यकीय तपासात उघड झाले आहे.