महापालिका प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी; नागरिक त्रस्त

गेल्या दोन महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसाने मीरा-भाईंदर शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असली तरी खड्डे पुन्हा उखडत असल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

शहरातील अनेक रस्त्यांची दरवर्षी पावसात दुरवस्था होत असते. प्रशासनाकडून दरवर्षी खड्डे बुजवण्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असते, परंतु पुन्हा पावसात हे खड्डे उखडत असल्याने रस्त्यांची अवस्था पुन्हा तशीच होत असते. मीरा-भाईंदर शहराची जमीन दलदलीची असल्याने रस्ते खचण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या ठिकाणी पाणी तुंबत असते, त्या ठिकाणी तर रस्त्यांची अवस्था अधिकच वाईट असते. यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते पुन्हा खोदून ते नव्याने करण्याची आवश्यकता आहे, परंतु तसे न करता दरवर्षी रस्त्यांची जुजबी दुरुस्ती करण्यात येत असल्याने रस्त्यांचे रडगाणे कायम आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा खड्डे पडण्याचे प्रमाण कमी आहे, परंतु शहरातील मुख्य रस्त्यांवर नाक्यानाक्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. भाईंदर पश्चिम येथील साठ फुटी रस्त्यावरील काँक्रीटीकरण न झालेल्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे याच भागात स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांचे जनसंपर्क कार्यालयही आहे. याशिवाय गोल्डन नेस्ट नाका, दीपक रुग्णालय नाका, आयुक्तांचे निवासस्थान असलेला कनाकिया रस्ता, सृष्टी, हटकेश आदी ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डय़ांचे जाळे पसरले आहे. या खड्डय़ांतून वाट काढताना वाहनचालकांची प्रचंड तारांबळ उडत आहे.

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त?

प्रशासन खड्डे बुजवण्याचे काम करत आहे, परंतु पावसामुळे त्यांचे डांबरीकरण करणे अशक्य झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे ठरावीक साच्याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना आता गणेशोत्सवाची वाट पाहाण्याव्यतिरिक्त पर्याय शिल्लक राहिलेला नाही.