मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजप पक्षांतर्गतच नगरसेवकांच्या घोडेबाजाराला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहेत. तसेच आपल्या मागणीतील महापौराला वगळण्यात येत असल्यामुळे नाराज आमदार गीता जैन यांनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीची निवडणूक येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या वेळी महापौरपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून महापौर डिंपल मेहता यांचा महापौरपदाचा कार्यकाल येत्या २७ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत नवीन महापौरांची निवड होणे आवश्यक आहे. आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यामधील अंतर्गत वादामुळे नगरसेवकांच्या घोडेबाजीला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. आपल्या गटातील नगरसेवक फुटू नये म्हणून माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजप पक्षातील काही नगरसेवकांना दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपचे ६१, शिवसेनेचे २२ आणि काँग्रेसचे १२ नगरसेवक आहेत. महापौरपदाकरिता एकूण ४९ नगरसेवकांचे समर्थन आवश्यक असणार आहे.

या वेळी अनुसूचित जाती प्रवर्गातुन ज्योत्स्ना हसनाळे, नीला सोन्स, रुपाली शिंदे आणि दौलत गजरे महापौरपदासाठीच्या स्पर्धेत आहेत. तर विरोधी पक्षातून केवळ अनंत शिर्के एकमेव पात्र असल्यामुळे उमेदवार असणार आहेत. अशा परिस्थितीत आपले राजकीय वर्चस्व टिकून ठेवण्याकरिता माजी आमदार नरेंद्र मेहता हे नगरसेविका रुपाली शिंदे यांना महापौर बनवण्याकरिता प्रयत्न करत आहेत तर आमदार गीता जैन नगरसेविका नीला सोन्स यांच्या प्रयत्नात असल्याच्या राजकीय चर्चा सर्वत्र सुरु आहेत. शिवाय शिवसेना आणि काँग्रेस पक्ष राज्यातील आघाडीमुळे भाजपमधील काही नगरसेवकांना हाताला घेऊन आपला महापौर विराजमान करतील का प्रश्न निर्माण झाला आहे.