मृत्यू दर ३.१९ टक्के तर केवळ २.२५ टक्के रुग्णांवर उपचार सुरू

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आलेख  दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. सद्य परिस्थितीत शहरात करोनामुक्त रुग्णांची संख्या ९४.५६ टक्क्यांवर जाऊन पोहोचली असल्यामुळे सामान्य नागरिकांकडून दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार ५२३ इतकी  आहे. तर आतापर्यंत ७५० रुग्णांचा करोनामुळे  बळी गेला आहे. अशा परिस्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आणि रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना करोनामुक्त करण्याचे आवाहन पालिका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे प्रति दिवस  वाढणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार करून  घरी पाठवण्यात येत असल्याची  दिलासादायक बाब समोर आली आहे.

टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर मीरा-भाईंदर शहरात रुग्णसंख्या वाढीचा आलेख झपाट्याने वर  जाताना आढळून आला होता. मात्र गेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

त्यामुळे करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आता तब्बल ९४.५६ टक्के झाले आहे. तर करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण २.२५ टक्के आणि करोना बळी रुग्णांचे प्रमाण ३.१९ एवढे झाले आहे. नागरिकांनी कठोरपणे नियमांचे  पालन  केल्यास हे प्रमाण लवकरच कमी करून करोनावर यश प्राप्त करण्यात येईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गृह विलगीकरणात २७६ रुग्ण 

मीरा-भाईंदर शहरात ४६१ रुग्णांवर  उपचार सुरू आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे २७६ रुग्ण हे गृह विलगीकरणात उपचार घेत  आहेत. तर कोविड केंद्र आणि कोविड रुग्णालयात १८२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.