News Flash

वाजत-गाजत करवसुली सुरू

करबुडव्या थकबाकीदारांना जागे करण्यासाठी महापालिकेने बॅण्डबाजा वाजवत मालमत्ता करवसुली सुरू केली.

मीरा-भाईंदरचे कर्मचारी करवसुली करण्यासाठी प्रत्येक सोसायटीत बँडबाजाचा ताफा घेऊन जात आहेत.

करबुडव्यांना जागे करण्यासाठी महापालिकेची मोहीम
करबुडव्या थकबाकीदारांना जागे करण्यासाठी महापालिकेने गुरुवारपासून बॅण्डबाजा वाजवत मालमत्ता करवसुली सुरू केली. बॅण्डबाजाचा लवाजमा घेऊन महापालिका कर्मचारी थकबाकीदारांकडे जात आहेत आणि इमारतीखाली बॅण्ड वाजवायला सुरू करत आहेत. किमान लज्जेपोटी तरी थकबाकीदार कर भरतील अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना आहे. महापालिकेच्या या अनोख्या उपाययोजनेमुळे नागरिकांमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे.
यंदा महापालिकेची करवसुली अतिशय निराशाजनक आहे. या वर्षी १९० कोटी करवसुलीचे उद्दिष्ट असताना प्रशासनाने केवळ चाळीस टक्केच मालमत्ता करवसुली केली आहे. पालिकेच्या मुख्य उत्पन्नात मालमत्ता कराचा समावेश असल्याने करवसुलीचा थेट परिणाम विकासकामांवर होत असतो. यासाठीच मार्च अखेपर्यंत लक्ष्याच्या जवळपास पोहोचण्यासाठी प्रशासन आटापिटा करत आहे. याचाच एक भाग म्हणून थकबाकीदारांच्या घराजवळ बॅण्डबाजा वाजविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आजपासून शहरात बॅण्डची तीन पथके फिरविण्यात येत आहेत. इमारतीखाली बॅण्ड वाजू लागताच इमारतीमधील नागरिक बॅण्ड वाजविण्याचे कारण महापालिका कर्मचाऱ्यांना विचारतात. त्या वेळी इमारतीमधील थकबाकीदारांची यादीच त्यांच्यासमोर ठेवली जाते. आपली थकबाकी सार्वजनिक होत असल्याची लाज वाटून तरी थकबाकीदार कर भरतील, अशी आशा या कर्मचाऱ्यांना आहे. करभरणा केला नाही तर नळजोडण्या खंडित करण्याची घोषणाही या वेळी करण्यात येत आहेत.
सध्या तीन बॅण्ड पथके नेमण्यात आली आहेत. मीरा रोड व भाईंदर पूर्व भागात आजपासून ही पथके फिरत आहेत. लवकरच आणखी तीन बॅण्ड पथके नेमण्यात येणार असून प्रत्येक प्रभागात हे पथक फिरणार आहे. याव्यतिरिक्त नाक्या-नाक्यावर थकबाकीदारांची यादी असलेले फलकदेखील लावण्यात येणार आहेत. तसेच वर्ग ‘एक’ व वर्ग ‘दोन’च्या अधिकाऱ्यांवरही विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे. आपली नित्याची जबाबदारी पार पाडून मोठय़ा थकबाकीदारांकडून करवसुली करण्याची अतिरिक्त जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिली. या उपाययोजनांनंतर तरी करवसुली समाधानकारक होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 3:42 am

Web Title: mira bhayandar corporation adopt innovative method for tax recovery
टॅग : Property Tax
Next Stories
1 कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास कारवाई
2 सांडपाण्याच्या नाल्यांवर कल्पक उद्याने
3 अवयवदानाच्या प्रसारासाठी मॅरेथॉनची धाव
Just Now!
X