– मयुर ठाकुर

मिरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा बुधवारी पार पडली. यावेळी महासभेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असताना काही नगरसेवक मात्र मोबाइलवर फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यात व्यस्त होते. यामुळे नगरसेवकांना खरंच लोकांच्या समस्यांबद्दल गांभीर्य आहे की नाही ? अशी विचारणा होत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा बुधवारी भरवण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीमुळे १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन रद्द करणे, विकास आराखड्यातील आरक्षण फेरबदल करणे, काळजीवाहक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ तसंच शहर विकास अधिकारी पदाच्या नेमणूक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा महासभेत होणार असल्यामुळे सर्वांचं लक्ष याकडे लागलं होतं. परंतु अगदी महासभा सुरु झाल्यानंतर तासाभरातच काही नगरसेवक सभागृहात सुरु असलेल्या चर्चेत सहभागी होण्यापेक्षा मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अशा सामाजिक माध्यमांवर गर्क असल्याचं दिसून आलं.

शहरांच्या विकासाकरिता प्रत्येक भागातून निवडणूक प्रक्रिया करून लोकप्रतिनिधींची निवड करण्यात येते. जेणेकरून शहरातील विविध प्रश्न मांडले जाऊन त्यावर योग्य तो निर्णय घेतला जावा अशी लोकांची अपेक्षा असते. परंतु काही बेजबाबदार लोकप्रतिनिधी महत्वाची महासभा सुरु असताना मोबाईल माध्यमांवर व्यस्त असल्यामुळे विकास होणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे..

मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता असल्यामुळे सभागृहात ठराव मांडल्यानंतर अधिक काळ चर्चा न होता ठराव मान्य करण्यात येतो. परंतु अशा परिस्थितीत महासभेत समाजमाध्यमांवर वेळ व्यतीत करून महासभेचा अपमान करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.