भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात एकीकडे करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे, तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त रुग्णाचे प्रमाणदेखील वाढले आहे. आतापर्यंत तब्बल ६८ टक्के रुग्णांना करोनामुक्त करण्यात यश प्राप्त झाले असून रुग्ण दुपट्टीचा वेग २८ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजारांवर पोहोचली आहे, तर आतापर्यंत एकशेचाळीसहून अधिक रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. या परिस्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आणि रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना करोनामुक्त करण्याचे आवाहन पालिका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे प्रति दिवस शंभरच्या गतीने वाढणाऱ्या रुग्णांनादेखील योग्य उपचार करून घरी पाठवण्यात येत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर मीरा-भाईंदर शहरात रुग्णसंख्या वाढीचा आलेख झपाटय़ाने वर जाताना आढळून येत आहे. गेल्या १२ दिवसांत तब्बल पंधराशेहून अधिक रुग्णांची भर पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; परंतु गेल्या पाच दिवसांत ७२८ नागरिकांना करोनामुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण आता सरासरी ६८ टक्के झाले आहे, तर करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण २७% आणि करोना बळी रुग्णांचे प्रमाण ५ टक्के एवढे झाले आहेत. नागरिकांनी कठोरपणे नियमांचे पालन  केल्यास हे प्रमाण लवकरच कमी करून करोनावर यश प्राप्त करण्यात येईल, अशा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.