तिमाहीत मीरा-भाईंदर

भाईंदर : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेला बसला आहे. गेल्या तिमाहीत पालिकेचे तब्बल २८ कोटींचे  महसुली उत्पन्न रखडले असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९५ कोटी महसूल उत्पन्न जमा होण्याची अपेक्षा होती, परंतु केवळ ६७ कोटींचे महसूल उत्पन्न जमा झाले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेला वस्तू सेवा कर अनुदान आणि इतर बाबींतून महसूल उत्पन्न प्राप्त होत असते. पालिकेचे अर्थसंकल्प मांडताना तसेच गेल्या वर्षी प्राप्त झालेल्या महसूल उत्पन्नातून चालू वर्षांच्या महसूल उत्पन्नाचा अंदाज बांधला जातो. मीरा-भाईंदर महानगरपालिकेला एप्रिल ते जून २०२० या पहिल्या तिमाहीत महिन्यात ९५ कोटी रुपयांचा महसूल विविध करांतून मिळेल, असा अंदाज होता. परंतु करोनामुळे सर्वच विस्कटले असल्याने ६७ कोटींचे रुपये म्हणजे उत्पन्न पालिका तिजोरीत जमा झाले आहे.

पालिकेला गेल्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान एकूण ९५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यात वस्तू व सेवा अनुदानातून ५१.२७ कोटी आणि इतर महसूल उत्पन्नातून  ४४.६० कोटी रुपये प्राप्त झाले होते, परंतु चालू वर्षांत या उत्पन्नात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.

यंदा वस्तू व सेवा अनुदानातून ५५.३८ कोटी रुपयांची वाढ झाली असली तरी इतर महसूल उत्पन्न हे केवळ १२.४१ कोटी इतकेच  प्राप्त झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण महसूल उत्पन्नात २८ कोटीचे नुकसान झाले असून इतर महसूल उत्पन्नात तब्बल ३३.१९ कोटींचे नुकसान झाले आहे.

मीरा-भाईंदर शहरात महानगरपालिकेमार्फत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातच घट झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांवर होऊ  शकतो. तसेच करोना काळात राज्य शासनाचीदेखील आर्थिक कोंडी झाली असल्यामुळे अनुदान प्राप्त होण्यास देखील बराच कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर महसूल उत्पन्नात घट

मीरा-भाईंदर महानगरपालिकेला शहरातील वेगवेगळ्या कामाद्वारे मोठय़ा प्रमाणात महसूल  प्राप्त होत असतो. परंतु करोनाचे संकट डोक्यावर आल्याने या महसूल उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. सुमारे ४५ कोटी रुपये इतर महसूल उत्पन्नातून पालिका तिजोरीत जमा होणार असल्याची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात १२ कोटीच रुपये जमा झाले असल्याचे आकडय़ावरून स्पष्ट झाले आहे.