स्वच्छतेसह प्लास्टिक वरील कारवाई करण्यास उपायुक्त रस्त्यावर

भाईंदर : ‘स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका   क्षेत्रात ‘स्वच्छ सर्वेक्षण मोहीम २०२१‘ ची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात स्वच्छता न राखणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

केंद्र शासनामार्फम्त संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येते.त्यानुसार  येत्या ७ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत मिरा भाईंदर शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मोहीम राबवण्यात येत आहे.याकरिता शहरातील आरोग्य विभागाला  बाजारात स्वच्छता ठेवणे, वृक्ष प्राधिकरण विभागाला कापलेल्या झाडांचा पालापाचोळा उचलने  आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावरील डेब्रीज उचलण्याचे आदेश देण्यात आले आहे.

गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण‘ मोहिमेत  मिरा भाईंदर शहराचा देशात १९ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता.त्याच प्रकारे कचरा मुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारी मुक्त कार्यामुळे ओडीएफ   म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याकरिता पालिका प्रशासन  प्रयत्न करणार असल्याची माहिती उपायुक्त संभाजी पानपट्टे यांनी दिली.

प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

टाळेबंदी शिथिलतेनंतर मिरा भाईंदर शहरात प्लास्टिक पिशिवच्या वापरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याची तक्रार पालिका प्रशासनाला करण्यात येत होती.त्यामुळे अश्या प्लास्टिक विक्री धारकांवर उपायुक्त संभाजी पानपट्टे यांच्या उपस्थितीत  कारवाई  करून ६० हजार रुपयांचा दंड वसुल झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.