भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालय-१ च्या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. ही इमारत ३५ वर्षांहूनही अधिक जुनी असल्यामुळे ती जर्जर झाली आहे. यामुळे पावसाळ्यात गळतीमुळे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कर विभागातील कागदपत्रे खराब झाल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. इमारतीची इतकी दुरवस्था झाली आहे की, शेजारून जर एखादे अवजड वाहन गेल्यास इमारतीला कंपने जाणवत असल्याची तक्रार कर्मचारी करत आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालय क्र.१ ची इमारत तीन मजली आहे. या इमारतीच्या स्वच्छतेकडे आणि देखभालीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. या इमारतीत पहिल्या मजल्यावर आरोग्य विभाग, कर विभाग, दुसऱ्या मजल्यावरील विभाग अधिकारी कार्यालय, अध्यक्ष कार्यालय, आवक-जावक विभाग, परवाना विभाग आहे. तर शेवटच्या मजल्यावर गळतीमुळे तिसरा मजला गोदाम आणि कागदपत्रे  ठेवण्यासाठी वापरला जात आहे. त्याची पावसातील गळती उंदीर घुशीने दुरवस्था केली आहे. या ठिकाणी ठेवलेल्या कार्यालयीन नोंदी आणि कागदपत्रे उंदरांकडून  खाल्ली जात असून नष्ट होत आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरत आहे.

२०१५ मध्ये तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्यामुळे त्यावेळी कर विभाग दुसऱ्या मजल्यावर हलविण्यात आला होता. तेव्हापासून या इमारतीतील  असलेली सर्व विभागीय कार्यालये स्थानांतरित करण्याची मागणी होत आहे. याकरिता कर्मचाऱ्यांकडूनच पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून तक्रार करण्यात येत आहे.मात्र त्यांची दखल घेतली गेलेली नाही.

लवकरच प्रभाग कार्यालय -१ चे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याकरिता योग्य जागेचा शोध सुरू आहे.

दीपक खंबित, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग