पाणीकपातीनंतर पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली असल्याने मीरा-भाईंदरच्या नागरिकांनी आता विहिरींचा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. गावात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक विहिरींवर पाण्यासाठी गर्दी उसळत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसू लागले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी या दोन्ही स्रोतांनी तीस टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यातच एमआयडीसीने ही कपात ५५ टक्क्यांवर नेण्याचे घोषित केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. नागरिकांना सध्या तब्बल १०० ते १२० तासांनी पाणी मिळू लागल्याने घराघरांत पाण्याचा खडखडाट झाला आहे. यामुळे लोक आता पाण्याच्या पारंपरिक स्रोताकडे वळू लागले आहेत. भाईंदरच्या मूळ गावात पूर्वी घराघरांत विहिरी होत्या, तसेच ठिकठिकाणी सार्वजनिक विहिरीदेखील होत्या. यापैकी बारा विहिरी आजही वापरात आहेत, शिवाय अनेक ठिकाणी सार्वजनिक तलावही आहेत. या पाण्याचा वापर करण्यावाचून दुसरा पर्यायही शिल्लक राहिलेला नाही.
महापालिकेने टँकर देणे बंद केल्याने खासगी छोटय़ा टँकरचा भाव भलताच वधारला आहे. ५०० लिटर पाण्यासाठी अडीचशे ते चारशे रुपयांची मागणी हे टँकरवाले करत आहेत. शिवाय पाणी चांगले मिळण्याची कोणतीही खात्री नाही. याचसाठी लोकांना अखेर विहिरी व तलावांसारख्या पाण्याच्या पारंपरिक स्रोताचाच आधार वाटू लागला आहे. मात्र वर्षांनुवर्षे विहिरींचा वापर झाला नसल्याने विहिरींमधून मोठय़ा प्रमाणावर गाळ जमा झाला आहे. पालिकेने गाळ उपसून विहिरी स्वच्छ केल्या, तर चांगले पाणी मिळण्याची शक्यता असल्याने पालिकेने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.