05 April 2020

News Flash

मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाची घोषणा

ठाणे तहसीलदार कार्यालयाअंतर्गत सध्या ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या तीन महानगरपालिका तसेच ग्रामीण भागाचा समावेश आहे.

मीरा-भाईंदर शहरासाठी स्वतंत्र अतिरिक्त कार्यालय निर्माण करत असल्याची घोषणा शासनाकडून सोमवारी करण्यात आली. याबाबतचे अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. मीरा भाईंदरला तहसीलदार कार्यालयाऐवजी अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाची निर्मिती होणार असल्याचे वृत्त लोकसत्ता वसई-विरार सहदैनिकात काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. मीरा-भाईंदरला स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाच्या निर्मितीमुळे नागरिकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

ठाणे तहसीलदार कार्यालयाअंतर्गत सध्या ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई या तीन महानगरपालिका तसेच ग्रामीण भागाचा समावेश आहे.  ठाण्याच्या तहसीलदार कार्यालयावर कामाचा मोठा ताण होता. शिवाय मीरा-भाईंदरमधील नागरिकांच्या दृष्टीने ठाण्यातील तहसीलदार कार्यालय सोयीचे नव्हते. त्यामुळे मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाचा विचारधीन होता.

या संदर्भातील पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन तसेच पदांचे आढावे याची तपासणी करण्यसाठी शासनाने उच्च स्तरीय सचिव समिती स्थापन केली होती. या समितीने ८ जुलैला मीरा-भाईंदरसाठी अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली होती.

दोन वर्षांपूर्वी मीरा-भाईंदरला स्वतंत्र तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र मीरा-भाईंदरला तहसीलदार कार्यालयाऐवजी अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन होणार असल्याचे वृत्त लोकसत्ता वसई विरार सहदैनिकाने ३१ ऑगस्टला प्रसिद्ध केले होते. याबाबतचे शासन आदेश लवकरच होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार ९ सप्टेंबरला शासनाने अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्मितीचे आदेश जारी केले.

स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार या पदासोबतच एक नायब तहसिलदार, एक अव्वल कारकून आणि ४ लिपिक अशा सात पदांना मंजूरी देण्यात आली आहे. अतिरिक्त तहसिलदारांच्या अधिकारा अंतर्गत मीरा-भाईंदरसाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले असून त्यात १९ महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहितेनुसार तहसिलदारांना असलेले सर्व अधिकार अतिरिक्त तहसिलदारांना मीरा भाईंदर कार्यक्षेत्रापुरते प्रदान करण्यात आले आहेत. अतिरिक्त तहसिलदार यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पहाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 2:18 am

Web Title: mira bhayandar tahsildar office akp 94
Next Stories
1 भाईंदरमध्ये आठ लाखांचे विदेशी मद्य जप्त
2 २७ गावांना जलदिलासा
3 खारेगाव टोलनाका अपघात तिघे जखमी
Just Now!
X