News Flash

करोनामुळे अर्थसंकल्प ढासळला

मीरा-भाईंदर महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा प्रशासकीय अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला.

यंदा करोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले असून या तुटीमुळे यंदाचा अर्थसंकल्प १५०९ कोटींचा तयार करण्यात आला आहे.

करवाढ नसलेला मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा १५०९ कोटींचा अर्थसंकल्प; १२५ कोटींची कपात

लोकसत्ता वार्ताहर

मीरा-भाईंदर महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा प्रशासकीय अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. गेल्या वर्षी १६३४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र, यंदा करोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले असून या तुटीमुळे यंदाचा अर्थसंकल्प १५०९ कोटींचा तयार करण्यात आला आहे. जवळपास सव्वाशे कोटींची कपात अर्थसंकल्प करण्यात आली आहे, तर यंदा महत्त्वाच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला असून अंदाजपत्रातील तरतुदीवर चर्चा केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा सन  २०२०-२१ चा सुधारित १२६५ कोटी ८६ लाख ५० हजार आणि सन २०२१-२२ चा मूळ १५०९ कोटी १७ लाख ३५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक आहे. करोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची  आर्थिक घडी मोडल्याने कोणत्याही स्वरूपाची करवाढ यंदा  करण्यात आलेली नाही. तसेच टाळेबंदीमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत थंडावल्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढवण्याकरिता अधिकाधिक भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे.

शिक्षण विभाग

पालिकेच्या एकूण ३६ शाळा शहरात उपलब्ध आहेत.  या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागात अत्याधुनिक बदल करण्याकरिता २४.४६  कोटी खर्चाची  तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

खर्चाच्या ठळक बाजू

सार्वजनिक बांधकामांवर भर

शहरात वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना विविध स्वरूपांची सुविधा पुरवण्यावर अधिक  भर देण्यात आला आहे. यात रस्ते, नाले तसेच नाल्यावरील झाकणे व बांधकाम दुरुस्तीकरिता तब्बल ४७५ कोटी  म्हणजे सर्वाधिक खर्चाची तरतूद यंदा अर्थसंकल्पात  करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनातील खर्च

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत स्थायी आणि अस्थायी स्वरूपात मोठय़ा प्रमाणात कर्मचारी नागरिकांना सेवा देण्याचे काम करत असतात. या पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता १६३.९१ कोटी रुपये खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

आरोग्य व्यवस्थापनेकरिता अल्प तरतूद

शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला आतापर्यंत यश प्राप्त झाले असले तरी  भविष्यात आरोग्य व्यवस्थापनेवर अधिक भर देण्याची अवश्यकता आहे. याकरिता प्रभाग सफाई, नालेसफाई, घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालय आणि दवाखानेनिर्मितीकरिता केवळ १५९.७० कोटी खर्चाची तरतूद  अर्थसंकल्पात  करण्यात आली आहे.

उद्यान विकासाला निधी

वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना जागेची मोठय़ा प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी आरक्षित भूखंडांवर अधिकाधिक उद्याननिर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे. याकरिता १७.८५ लाख रुपये खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

विद्युत देयके व कामे

शहरात पदपथावरील दिवे व इतर कामांमुळे प्रशासनाला मोठय़ा प्रमाणात वीज देयक भरावे लागते. यात कमतरता आणण्याकरिता सर्वत्र एलईडी दिवे लावण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत बिलावरील खर्चाकरिता ४४ कोटी खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

नगरसेवक निधीत वाढ

महानगरपालिकेतील नगरसेवकांना आपल्या प्रभागात विकासकामे करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. गतवर्षांत नगरसेवक निधीकरिता १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र हा निधी कमी पडत असल्याची तक्रार नगरसेवक वारंवार करत असल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटींची वाढ करून एकूण २५.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिला बालकल्याण

महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील महिलांना विविध स्वरूपांचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.  प्रत्येक प्रभागात बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. यात अधिक विकास करण्याकरिता ३ कोटी रुपयांची तरतूद  आहे.

नवीन प्रकल्प

शिवसृष्टी प्रकल्प

ऐतिहासिक वारसा असलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या जवळील ९ एकर भूभागावर  शिवसृष्टी उभारण्यास पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळाली  आहे. या ठिकाणी पर्यटक स्थळ तयार करून  घोडबंदर किल्ला  नावाजला जाणार आहे.  त्यामुळे पर्यटकांना  छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी माहिती जाणून घेण्यास मदत करण्याकरिता तसेच किल्लय़ाच्या सुशोभीकरणाकरिता ८ कोटी रुपयांची तरतूद यंदा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणे 

महानगरपालिकेमार्फत घोडबंदर परिसरात शिवसृष्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या भागातील मुख्य चौकावर ३० फूट उंच ब्राँझ धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुतळ्याच्या उभारणीकरिता आणि सुशोभीकरणाकरिता ४ कोटी रुपयांची तरतूद यंदा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन कलादालन 

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील गोल्डन नेस्ट येथील आरक्षित भूखंडावर बाळासाहेब ठाकरे कलादालन, तर मीरा रोड येथील आरक्षित भूखंडावर प्रमोद महाजन कलादालन उभारण्यात येणार आहे.   शिवसेना आणि भाजप या पक्षाकरिता हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे  एकूण ४६ कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सूर्या प्रकल्प योजना

शहरात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक जटिल होत चालला आहे. सद्य:स्थितीत महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमएमआरडीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र भविष्यात शहराला पाण्याची आवश्यकता भासणार असल्यामुळे पालघर येथील सूर्या धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात सूर्या धरण योजनेकरिता ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पर्जन्यवाहिन्या अमृत अभियान

मीरा भाईंदर शहर हे जलद विकसित होत असल्यामुळे नव्या इमारती या क्षेत्रात तयार होत आहे. त्यामुळे या इमारतींना पाणीपुरवठा करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. याकरिता पर्जन्यवाहिन्या अमृत अभियानअंतर्गत २९ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सडक योजना 

शहरातील रस्ते टिकाऊ व उपयुक्त असण्याकरिता प्रशासनाकडून सिमेंट काँक्रीट रस्त्याची निर्मिती करण्यात येत आहे. गतवर्षांत १० ठिकाणी असे सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारण्यात आले होते. त्यामुळे यंदादेखील मुख्यमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत अजून काँक्रीट रस्त्याच्या निर्मितीकरिता १०२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 1:14 am

Web Title: mira bhayander budget 2021 collapsed due to corona dd 70
Next Stories
1 पाण्यासाठी पुन्हा संघर्ष सुरू
2 ‘अ‍ॅप’मुळे महसुलात वाढ
3 अर्थसंकल्प सादरीकरण मुखपट्टीअभावी वादात
Just Now!
X