मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांचे आदेश; शहरात २८ धोकादायक इमारती

आगामी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारती मार्च महिन्याअखेपर्यंत रिकाम्या करण्याचे आदेश मिरा-भाईंदर महानगरापालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या वर्षी शहरात एकंदर २८ धोकादायक इमारती होत्या. यातील तीन इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दुरुस्ती करून घेण्याचा अहवाल आल्याने या इमारतींनी दुरुस्ती करवून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तीन इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेऊन महापालिकेच्या कारवाईवर स्थगिती आदेश मिळवले असल्याने त्याच्यावर कारवाई करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. चार इमारती प्रशासनाने रिकाम्या करून घेतल्या आहेत, तर नऊ इमारती तोडण्याचे काम सध्या सुरू आहे. उर्वरित नऊ इमारतींमधील रहिवासी मात्र इमारत रिकामी करून देण्यास तयार नाहीत. या रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या अनेक वेळा नोटिसा बजावल्या आहेत. परंतु रहिवाशांनी या नोटिशीला दाद दिली नाही. इमारत रिकामी केल्यानंतर त्याची पुनर्बाधणी करण्याची कोणतीही शाश्वती नाही, तसेच सरकरकडूनही याबाबतचे धोरण जाहीर केले जात नाही. त्यामुळे रहिवासी आहे, त्याच अवस्थेत जीव मुठीत धरून धोकादायक इमारतींमधून वास्तव्य करून आहेत. यातील बहुतांश इमारतींमध्ये राहणारी कुटुंबे कनिष्ठ मध्यमवर्गीय असल्याने भाडय़ाची घरे घेऊन रहाणेही त्यांना न परवडणारे आहे. त्यामुळेच इमारती रिकाम्या करण्यास रहिवासी नकार देत आहे.

अशा इमारतीदेखील रिकाम्या करून त्या तोडण्याचे आदेश आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात आयुक्तांनी नुकतीच एक बैठक घेऊन त्यात प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याला धोकादायक इमारत तोडण्याची मुदत घालून दिली आहे त्यानुसार प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई करायची आहे. याव्यतिरिक्त शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्याचे आदेशही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात एकंदर २२ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करायची आहे तर ३४ धार्मिक स्थळे नियमित करायची कार्यवाही  ३१ मार्चअगोदर अधिकाऱ्यांना पार पाडायची आहे.