News Flash

कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास कारवाई

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम- २००० नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम- २००० नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेचा रहिवाशांना इशारा; आदेश न मानल्यास नोटीस देऊन पाणीपुरवठा तोडणार
कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. या समस्येवर मात करायची असेल तर ओला आणि सुका कचरा वेगळा केला पाहिजे. मीरा-भाईंदर महपालिकेने शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी कचरा देतानाच तो वेगळा करून द्यावा, अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम- २००० नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादानेही तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही बाब उशिरा का होईना, पण गांभीर्याने घेतली आहे. एक मार्चपासून नागरिकांनी ओला व सुका कचरा दोन वेगळ्या डब्यांत साठवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी गृहनिर्माण सोसायटय़ांनी हिरवा व पिवळा असे दोन डबे विकत घ्यायचे आहेत. ओला कचरा हिरव्या डब्यात व सुका कचरा पिवळ्या डब्यात ठेवायचा आहे. डब्याच्या रंगाबाबत कोणतेही बंधन नाही, मात्र दोन डबे वेगळे ठेवणे आवश्यक आहे, असे महापालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले.
रहिवासी सोसायटय़ांना याबाबत आधीपासूनच सूचना द्यायला सुरुवात करण्यात आली असून या सूचनांनुसार एक मार्चपासून महापालिका ओला व सुका कचरा वेगळा गोळा करणार असल्याने नागरिकांनी त्याचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
अन्यथा पंधरा दिवसांनंतर कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा महापालिका उचलणार नाही. त्यानंतरही यात सुधारणा झाली नाही तर सोसायटय़ांना नोटिसा देऊन त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी माहिती पानपट्टे यांनी दिली.

’ गोळा करण्यात आलेला ओला कचरा सध्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात नेण्यात येणार आहे. या ठिकाणी बायोमिथेनायजेशन अथवा खतनिर्मिती यापैकी एका पद्धतीने कचऱ्यावर शास्त्रेक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे.
’ ओल्या कचऱ्यात येणाऱ्या नारळाच्या करवंटय़ाही वेगळ्या करून त्या बाहेर देण्यात येणार आहेत. कचऱ्याला आग लागल्यानंतर करवंटय़ा सर्वाधिक काळ जळत असल्याने ही काळजी घेण्यात येणार आहे.
’ सुका कचरा महापलिकेच्या वेगवेगळ्या गोदामांत साठवला जाणार आहे. हा कचरा भंगार गोळा करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोफत देण्यात येणार आहें.
’ शहरात निर्माण होणारा औद्योगिक कचराही हळूहळू गोळा करणे महापालिका बंद करणार आहे. हा कचरा तळोजा येथील औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्रात पाठविण्यासाठीची पावले उचलण्यात येणार आहेत.
’ कचऱ्याच्या अशा वर्गीकरणामुळे घनकचरा प्रकल्पात दररोज जमा होणारा कचरा सुमारे ४० टक्क्यांनी कमी होणार आहे.

जनजागृतीसाठी मोहीम
नागरिकांनी कचरा वेगळा करावा यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी अखील भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया, त्याची आवश्यकता पटवून देणारी एक चित्रफीत रहिवाशांना दाखवण्यात येणार आहे.

’ ओला कचरा : ज्याचे विघटन होते तो ओला कचरा मानला जातो. स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न व इतर कचरा, भाजीपाला, फळे, नारळाच्या कवटय़ा, फुले, बागेतील कचरा याचा यात समावेश होतो.
’ सुका कचरा : पुनर्वापर करता येणारा कचरा सुका कचरा असतो. यात प्लास्टिक, लाकूड, थर्माकोल, धातूच्या वस्तू, काच, रबर, बाटल्या यांचा समावेश .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 3:41 am

Web Title: mira bhayander municipal corporation appeal for garbage classification
Next Stories
1 सांडपाण्याच्या नाल्यांवर कल्पक उद्याने
2 अवयवदानाच्या प्रसारासाठी मॅरेथॉनची धाव
3 ‘व्होडाफोन’ला जिल्हा ग्राहक मंचाची चपराक
Just Now!
X