प्रचार संपण्यास आठ दिवस शिल्लक; मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक आखाडय़ात बडय़ा नेत्यांची प्रतीक्षा

निवडणुकीचा प्रचार म्हटला की प्रचार रॅली, जाहीर सभा, चौक सभा, घोषणांचा दणदणाट, आरोप-प्रत्यारोप असे चित्र दिसून येत असते, परंतु मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे आठ दिवस शिल्लक राहिले असले तरी वातावरणात काहीशी मरगळच असल्याचे दिसून येत आहे. उमेदवार घरोघरी फिरून प्रचार करण्यावरच जास्त भर देत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे अद्याप निवडणुकीचे वातावरण तापलेले दिसून येत नाही. सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सर्वच पक्षांचे मातब्बर नेते अधिवेशनात व्यग्र आहेत. येत्या शुक्रवारी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे आणि त्यानंतरच नेत्यांची फौज प्रचारासाठी मीरा-भाईंदरमध्ये अवतरणार असल्याची माहिती सूत्रांना दिली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या जाहीर सभेचा अपवाद वगळता प्रचाराची एकही जाहीर सभा अद्याप आयोजित झालेली नाही. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने एकही बडा नेता अथवा मंत्री प्रचारासाठी मीरा-भाईंदरमध्ये आलेला नाही. अधिवेशन शुक्रवारी संपत आहे. त्यानंतर शनिवारपासून हे नेते प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. खुद्द मुख्यमंत्री निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत.

विविध पक्षांची रणनीती

भाजप : भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मीरा-भाईंदरमध्ये येणार आहेत.  मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय, जैन, गुजराथी मते मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यानुसार भाजपने रणनीती आखली आहे.  दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी तसेच गुजराती नेत्यांना आणण्याची योजना आहे.

  • शिवसेना : शिवसेनेकडून मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच एकमेव जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस तसेच जाहीर सभांना केवळ कार्यकर्त्यांचीच उपस्थिती लागत असल्याने सेनेने इतर नेत्यांच्या जाहीर सभा घेण्याचे टाळले आहे.
  • काँग्रेस : काँग्रेसकडून महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा मुजोरपणा या मुद्दय़ांना प्रचारात हात घालण्यात येणार आहे, तसेच विकासकामांवरही जोर देण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एक सभा झाली.
  • मनसे : मनसेकडून प्रचाराची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर आहे. तरी बाळा नांदगावकर आणि शालिनी ठाकरे प्रचारात सहभागी होणार आहेत. शहरात सुरू असलेली सेना-भाजपची फलकबाजी यावर मनसेकडून लक्ष्य केले जाणार आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची सर्व मदार माजी खासदार संजीव नाईक यांच्यावरच आहे. गेल्या अडीच वर्षांतील युतीच्या महापालिकेतील कारभारावर प्रचारादरम्यान टीकास्त्र सोडण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, अजित पवार, गणेश नाईक आदी नेत्यांच्या सभांचे नियोजन आहे.