शहरातील अनेक नेते, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; भाजप कमकुवत असलेल्या ठिकाणांचा आढावा

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री अचानक मीरा-भाईंदरला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी या वेळी चर्चा केली. निवडणुकीसाठी भाजपकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात काही प्रभागांत भाजप कमकुवत असल्याचे दिसून आल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मीरा-भाईंदरला वैयक्तिक भेट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित आहे. सुरुवातीच्या काळात भाजपच्या स्थानिक पातळीवरून ९५ जागांपैकी ७५ जागा जिंकण्याचा दावा केला जात होता, परंतु निवडणूक जशी जवळ येत गेली, तसे भाजपचा ७५ जागांचा दावा फोल असल्याचे स्पष्ट होत गेले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत वैयक्तिक लक्ष घालण्यास सुरुवात केली. भाजपने निवडणुकीसाठी तयार केलेल्या वॉररूममध्ये मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खास माणसांनी तळ ठोकला. शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची इत्थंभूत माहिती मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्याचे काम ही माणसे करतात.

याचसोबत प्रत्येक प्रभागात पक्षातर्फे मतदारांचे सर्वेक्षणही वेळोवेळी करण्यात येत आहे. याचा अहवालदेखील मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवला जात आहे. त्यावरून पक्षाची प्रत्येक प्रभागातील स्थिती काय आहे याचा अंदाज मुख्यमंत्र्यांना येत आहे. या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री मीरा-भाईंदरचा दौरा केला. मुख्यमंत्र्याच्या १७ ऑगस्ट रोजी शहरात दोन प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या असताना मुख्यमंत्र्यांनी शहराचा मध्येच दौरा केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराशी संवाद

ज्या प्रभागात पक्ष कमजोर वाटत आहे, अशा प्रत्येक प्रभागाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला. त्या प्रभागात असलेल्या पक्षाच्या उमेदवारांशी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे थेट संवाद साधला. प्रचारादरम्यान येत असलेल्या समस्या, कार्यकर्त्यांकडून दिला जाणारा प्रतिसाद, पक्षांतर्गत विरोधक याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधिताना योग्य त्या कानपिचक्याही दिल्या असल्याचे समजते. काही भागांत प्रचार कमी पडत असेल तर त्या ठिकाणी पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.