News Flash

राजकीय अस्तित्व पणाला

दोन्ही दिग्गज उमेदवार समोरासमोर उभे असल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.

भाईंदर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक ही दोन नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई म्हणून ओळखली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी स्थायी समिती सभापती मॉरस रॉड्रिग्ज आणि शिवसेनेकडून माजी उपमहापौर स्टीवन मेन्डोन्सा या प्रभागात समोरासमोर लढत देत आहेत. दोन्ही विद्यमान नगरसेवक आतापर्यंत सलग चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असल्याने ही निवडणूक त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

भाईंदर पश्चिम येथील पूर्वीचे २ आणि २२ हे पूर्ण प्रभाग, २१ आणि २८ या प्रभागांचा काही भाग एकत्र करून नवा प्रभाग क्रमांक ७ तयार झाला आहे. भाजपच्या मॉरस रॉड्रिग्ज यांचा आधीचा संपूर्ण प्रभाग या नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे, मात्र शिवसेनेच्या स्टीवन मेन्डोन्सा यांचा जुना प्रभाग बराचसा कापला गेला आहे. भाजपने या प्रभागात आपले विद्यमान नगरसेवक मॉरस रॉड्रिग्ज, अ‍ॅड. रवी व्यास यांच्यासह नवख्या रक्षा भूपतानी आणि ज्यांचा या प्रभागाशी कोणताही संबंध नाही अशा दीपाली मोकाशी असे चार उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेकडे या प्रभागात स्वत:चे उमेदवार नव्हते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षात आलेल्या स्टीवन मेन्डोन्सा यांना सेनेने आखाडय़ात उतरवले आहे. मेन्डोन्सा यांच्या सोबत त्यांच्या भगिनी आणि गेली पंचवीस वर्षे सलगपणे नगरसेवकपदी निवडून येत असलेल्या ग्रीटा फेरो तसेच विद्या कदम आणि तरुण चेहेरा म्हणून कल्पेश जैन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या प्रभागात सर्वाधिक चर्चा आहे ती मॉरस रॉड्रिग्ज आणि स्टीवन मेन्डोन्सा यांच्यात होणाऱ्या लढतीची. दोन्ही दिग्गज उमेदवार समोरासमोर उभे असल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.

प्रभाग सातमध्ये भाईंदर या गावाचा मूळ परिसर आणि मोतीनगर पासून ते थेट बाबुभाई मेस्त्री चाळ या भागाचा समावेश आहे. गावात मराठी आणि ख्रिस्ती समाज राहातो. या भागात शिवसेनेची पारंपरिक मते आहेत. माजी आमदार गिल्र्बट मेन्डोन्सा यांना मानणाराही मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि शिवसेनेच्या चारपैकी तीन उमेदवार मूळ गावातील स्थानिक आहेत, त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. शिवाय आतापर्यंत स्टीवन मेन्डोन्सा हे आपल्या प्रभागातून चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. परंतु मोतीनगरपासून पुढच्या पट्टय़ात शिवसेनेचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे या परिसरावर शिवसेनेला मेहनत घ्यावी लागत आहे.शिवसेनेप्रमाणे गावात भाजपची देखील पारंपरिक मते आहेत, परंतु ती शिवसेनेच्या मानाने फार कमी आहेत. दुसरीकडे भाजपने दिलेल्या चार उमेदवारांपैकी मॉरस रॉड्रिग्ज यांचा अपवाद वगळता उर्वरित तीन उमेदवार मूळचे गावातले नाहीत. रॉड्रिग्ज हे आता मूळ गावात राहात नसले तरी त्यांचा वैयक्तिक संपर्क गावात आजही आहे. गावात शिवसेनेचे पारडे काहीसे जड आहे, तर मोतीनगरपासून पुढच्या भागात भाजपचे वर्चस्व आहे. मॉरस रॉड्रिग्ज आणि रवी व्यास यांचा हा परिसर असल्याने आणि या भागात गुजराती, जैन समाजाचे वास्तव्य असल्याने या भागात भाजप वरचढ आहे. मॉरस राड्रिग्ज देखील आतापर्यंत चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

त्यामुळेच येथील जैन मतांसाठी शिवसेनेने कल्पेश जैन यांना उमेदवारी दिली आहे. येथील जैन, गुजराती मतांच्या जोरावर भाजप चारही जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे, तर गावातील मेन्डोन्सा कुटुंबाच्या प्रभावाचा फायदा घेत आणि भाजपच्या जैन मतांमध्ये फूट पाडून या प्रभागावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा शिवसेना प्रयत्न करत आहे. यात कोण यशस्वी ठरते यावर मॉरस रॉड्रिग्ज आणि स्टीवन मेन्डोन्सा यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:57 am

Web Title: mira bhayander municipal corporation election 2017 word no 7
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांकडून स्वपक्षीयांची झाडाझडती!
2 मफतलाल जमीन लिलावाचा मार्ग मोकळा
3 हंडीमुळे कोंडी!
Just Now!
X