भाईंदर : करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरे करण्याकरिता मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडून देण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची गर्दी होऊन करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फूट, तर सार्वजनिक गणेशमूर्ती उंची चार फूट ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाला कमी नागरिक असावेत. तसेच नागरिकांनी घरीच तर मोठय़ा गृहसंकुलांमध्ये कृत्रिम तलावांमध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

नियम काय आहेत?

* गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला असेल तर हा उत्सव कमी दिवसच साजरा करावा.

* गणेशमूर्तीची उंची कमाल चार फूट असावी.

* मंडपामध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे.

* मंडपामध्ये भाविकांची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून तपासणी करून त्यांची नोंद ठेवावी.

* मंडपामध्ये एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत. तसेच प्रत्येकाने मुख्यपट्टय़ा लावावी.

* मंडपाची उंची जास्त असू नये. त्याचबरोबर मंडपामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद करणे मंडळांना बंधनकारक.