मीरा-भाईंदर महापालिकेच्या  निर्णयामुळे मंडळांमध्ये नाराजी

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांचे शुल्क वाढवण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. यंदापासून प्रति चौरस फूट एक रुपया याप्रमाणे शुल्क लागू करण्यात येणार आहे. महापालिकेने लागू केलेले हे शुल्क अधिक असल्याने त्यामुळे मंडळांवर आर्थिक बोजा पडणार आहे, असे सांगून गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मीरा-भाईंदर शहरात सुमारे दोन हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील अनेक मंडळांचा गणपती सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात येत असतात. अशा मंडळांना मंडप बांधण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्याने यावर्षी उत्सव मंडळांनी एक महिना अगोदर परवानगीसाठी अर्ज सादर करावेत, अशा सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

मंडप परवानगी संबंधित प्रभाग कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत. त्यानुसार अनेक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत, परंतुमंडप परवानगी देताना महापालिका प्रति चौरस फूट शुल्क प्रति दिन आकारणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंडळांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याआधी महापालिकेकडून सरसकट ठरावीक शुल्क आकारण्यात येत होते.

गणेशोत्सवात किमान एक हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात येतात. त्यानुसार मंडळांना प्रति दिन किमान एक हजार रुपये केवळ महापालिकेच्या शुल्कापोटी भरावे लागणार आहेत. त्यामुळे मंडळांना संपूर्ण उत्सवात १० ते १५ हजार रुपयांपर्यंतच्या शुल्काचा भरुदड बसणार आहे.

‘भरमसाट शुल्क अन्यायकारक’

मुंबई महानगरपालिकेने दहा दिवसांच्या मंडपासाठी केवळ १०० रुपये नाममात्र शुल्क आकारले जात आहे. ठाणे महापालिकेनेही वाजवी शुल्कच आकारलेले असताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेने भरमसाट शुल्क आकारणे अन्यायकारक आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांचे स्वरूप छोटे असून त्यांची आर्थिक उलाढालही मर्यादितच असते. त्यामुळे या अवाजवी शुल्काने गणेशोत्सव मंडळाचे कंबरडे मोडणार आहे, असे गणेशोत्सव मंडळांकडून सांगण्यात आले.