मीरा-भाईंदर महापालिकेसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी ९ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानासाठी एकूण ७७४ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमधील ९५ वॉर्डसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज ९४ वॉर्डसाठीच मतदान होईल. एकूण ५०९ उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. प्रशासनाने १०१ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील ५ मतदान केंद्र मीरा रोड येथील आहेत. तर ४ मतदार केंद्र ही भाईदरमधील आहेत. निवडणुकीसाठी शहरात सुमारे ४ हजार ७५० पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून तीन दिवस शहरामध्ये १६१ पोलीस अधिकारी, १ हजार ८४२ पोलीस कर्मचारी आणि ३०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी एकूण ५ लाख ९३ हजार ३३६ मतदार आहेत. यात पुरुष मतदार हे ३ लाख २१ हजार ७७० तर २ लाख ७१ हजार ५४९ हे महिला मतदार आहेत. इतर मतदार १७ आहेत.

LIVE UPDATES:

* दुपारी १२ वाजेपर्यंत अवघे १२ टक्के मतदान झाले

* मतदानाला अल्प प्रतिसाद

* सकाळी ९.३० पर्यंत फक्त ५.५ टक्के मतदान

* पावसामुळे मतदान केंद्र ओस

* क्वीन मेरी पार्क येथील मतदान यंत्र काही काळ बंद पडले

* भाजप-शिवसेना यांच्यात थेट लढत

*  ९४ जागांसाठी मतदान

* ५०९ मतदार नशीब आजमावत आहेत.

* अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांची गर्दी

*  मतदानाला सुरूवात, शहरात पावसाचीही रिपरिप सुरू