खड्डे भरण्यासाठीचे ‘कोल्ड मिक्स तंत्रज्ञान’ कुचकामी;
जुन्या पद्धतीनेच खड्डे भरण्याचे मीरा-भाईंदर पालिकेचे आदेश
एखादे काम जलदगतीने आणि उत्कृष्ट होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, पण हे तंत्रज्ञानच जर कुचकामी निघाले तर..? जुने तंत्रज्ञान स्वीकारण्यावाचून कोणताही पर्याय उरत नाही. मीरा-भाईंदर महापालिकेची गत सध्या अशा प्रकारेच झाली आहे. मंत्रिमहोदयांच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर ‘कोल्ड मिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरण्यात आलेले खड्डे अवघ्या २४ तासांत पुन्हा उखडू लागल्याने प्रशासनाने या तंत्रज्ञानाचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा जुन्या पद्धतीने तात्पुरते खड्डे भरून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.
गेल्या जवळपास महिनाभर पडणाऱ्या पावसाने शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू असल्याने खड्डे भरणे शक्य नसल्याचे कारण प्रशासनाकडून सागण्यात येत होते. मात्र गेल्या आठवडय़ात शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाला केंद्रीय मंत्र्यापासून राज्यातील मंत्री हजर राहिले. मंत्रिमहोदयांच्या आगमनासाठी शहरातील मुख्य रस्ते मात्र तातडीने खड्डेमुक्त करण्यात आले. शहरातील इतर रस्त्यांवरील खड्डे तसेच ठेवून केवळ मंत्रिमहोदयांचे आगमन होणाऱ्या रस्त्यावरील खड्डे भरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच ज्या मंत्र्यांच्या आगमनासाठी खड्डे बुजविण्यात आले होते, ते खड्डे मंत्र्यांची पाठ वळताच पुन्हा उखडले गेल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली.
भरण्यात आलेले खड्डे ‘कोल्ड मिक्स’ या अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने दुरुस्त करण्यात आले होते. पावसाळा सुरू असतानाही पावसाने थोडीशी उसंत दिल्यास या तंत्रामुळे खड्डे भरणे शक्य होते आणि ते टिकाऊ असतात, असे महापालिका अभियंत्यांचा दावा होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अभियंत्यांचे हे दावे सपशेल फोल ठरवले. भरलेले खड्डे अवघ्या चोवीस तासांतच उखडू लागल्याने प्रशासनाने राबवलेला प्रयोग अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. नवे प्रयोग राबविण्यापेक्षा आहे त्याच जुन्या पद्धतीने खड्डे भरून नागरिकांनी तातडीने दिलासा द्यावा, असे आदेश आयुक्त अच्युत हांगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पद्धतीत खड्डय़ात केवळ खडी व इतर मिश्रण टाकून ती रोड रोलरने दाबण्यात येते. यामुळे पाऊस सुरू असताना नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.