07 March 2021

News Flash

शहरबात : पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज

मीरा-भाईंदर शहराची झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या पाहता या ठिकाणी आज पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे.

प्रातिनिधिक फोटो

मीरा-भाईंदर शहराची झपाटय़ाने वाढणारी लोकसंख्या पाहता या ठिकाणी आज पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. लोकल ट्रेन आणि परिवहन व्यवस्थेखेरीज मेट्रो आणि जलमार्गाची खरी गरज या शहराला आहे. मीरा-भाईंदरमध्ये रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होते. पर्यायी वाहतुकीचे मार्ग झाल्यास वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होईल.

मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आणि भाईंदर ते ठाणे या जलमार्गाच्या बाबतीतही सकारात्मकता दाखवण्यात आल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी हे दोन्ही उपक्रम जलदगतीने पूर्ण होण्याची गरज आहे. मीरा-भाईंदर शहर हे मुंबईला अगदी लागून असल्याकारणाने येथील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत गेली. मुंबईतले जागांचे गगनाला भिडणारे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने मुंबईतल्या चाळीत राहणारा माणूस मीरा-भाईंदरला तुलनेने खूपच स्वस्त मिळणाऱ्या फ्लॅट संस्कृतीत विसावला. अवघ्या काही हजारांच्या संख्येत असलेली इथली लोकसंख्या त्यामुळे गेल्या वीस पंचवीस वर्षांत प्रचंड वाढून आज १२ ते १५ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्या वाढत असताना तिच्या गरजा पुरवणाऱ्या प्राथमिक सोयी-सुविधांकडे मात्र दुर्लक्षच झाले. मुंबईतला चाकरमानी, व्यावसायिक मीरा-भाईंदरला स्थायिक झाला तरी तो कामधंद्यासाठी सकाळी उठून मुंबईतच जातो. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरचा बोजा दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीच्या काळात मुंबई गाठण्यासाठी केवळ रेल्वे हाच पर्याय उपलब्ध होता. मात्र रेल्वे फलाटांवर उभे राहण्याइतपतही जागा शिल्लक राहत नसल्यासारखी परिस्थिती जेव्हा उद्भवली तेव्हा या ठिकाणी पहिल्यांदा बेस्ट प्रशासनाने आपली परिवहन व्यवस्था मुंबईबाहेर आणत मीरा-भाईंदरच्या नागरिकांना सेवा दिली. भाईंदर पूर्व ते बोरिवली, अंधेरी आणि सांताक्रूझ अशी सेवा पहिल्यांदा सुरू झाल्याने इथल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. बेस्ट प्रशासनापाठोपाठ मग ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेनेदेखील आपल्या बससेवा या ठिकाणी सुरू केल्या. मीरा-भाईंदर महापालिकेनेही स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली.

रस्त्यावरील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने होणारी वाहतूक कोंडी पाहता बसचा पर्याय सर्वच प्रवाशांना सोयीचा वाटत नसल्याने मग रेल्वे गाडय़ांची संख्या वाढविण्याची तसेच भाईंदर लोकल सुरू करण्याची मागणी वाढत गेली. एके काळी दर १५ ते २० मिनिटांनी येणारी लोकल आज सकाळच्या वेळात दर पाच मिनिटांनी उपलब्ध आहे. भाईंदर लोकलची संख्याही वाढली आहे. परंतु मीरा-भाईंदरसह वसई विरार पट्टय़ात राहायला येणाऱ्यांचा ओघ आजही सुरूच असल्याने ही व्यवस्थाही अपुरीच ठरत आहे. आज लोकलचा प्रवास म्हणजे अंगावर काटा आणणारा ठरत आहे. विरारहून येणारी लोकल आधीच भरून येत असल्याने भाईंदर स्थानकातील प्रवाशांना त्यात शिरकाव मिळणे म्हणजे मोठे आव्हानच आहे. मीरा रोड स्थानकातील प्रवाशांची त्यामुळे काय अवस्था होते, ही केवळ कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे अनेकांना दरवाजातच लटकण्याशिवाय पर्याय नसतो. यातूनच रेल्वे अपघातांची संख्यादेखील वाढू लागली आहे.

मेट्रोची मागणी

रेल्वेचा जीवघेणा प्रवास आणि बसचाही अपुरा पडणारा पर्याय यावर मुंबईतील मेट्रो मीरा-भाईंदपर्यंत आणण्याची मागणी मूळ धरू लागली आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मान्यही केली, परंतु मेट्रोच्या प्रसिद्ध झालेल्या आराखडय़ात ती केवळ दहिसपर्यंतच येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मीरा-भाईंदरच्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली. मेट्रो हवी यासाठी स्थानिकांनी संघर्षांची भूमिका घेतली. हजारो सह्य़ांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे धाडण्यात आले. त्यानंतर मेट्रो मीरा-भाईंदपर्यंत वाढवण्याचे आणि त्याचे आराखडे तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी मीरा-भाईंदरचा दौरा केल्यानंतर आता त्याचे आराखडेही तयार झाले असल्याचे समजते. मेट्रो मीरा-भाईंदरच्या रस्त्यावरील ‘गोल्डन नेस्ट’पर्यंत येणार असल्याने मुंबईला जाण्याचा कमी वेळेचा एक चांगला पर्याय प्रवाशांना मिळणार आहे.

जलमार्गाची गरज

भाईंदर ते ठाणे या जलमार्गाचा प्रस्तावही सुपात आहे आणि तो जात्यात येण्याची गरज आहे. भाईंदर पूर्व जेसल पार्क चौपाटीपासून ते ठाण्याच्या हद्दीतील गायमुखपर्यंत जलमार्ग सुरू करण्यास शासनाने तयारी दर्शवली आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्याला कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मीरा-भाईंदरची परिवहन सेवा असतानाही भाईंदर ते ठाणे ही सेवा एस टी महामंडळाने आजही सुरू ठेवली आहे यावरून हे सहज स्पष्ट होते. परंतु ठाणे घोडबंदर रस्त्यावरही वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. अवघ्या एक तासाच्या या प्रवासाला दीड ते दोन तास लागू लागले आहेत. कोंडीत अडकले तर हा वेळ आणखी वाढतो. त्यामुळे जलमार्गाचा पर्यायही चांगलाच किफायतशीर ठरणारा आहे.

रस्त्यांचे जाळे विणण्याची गरज

केवळ वाहतुकीचे विविध पर्याय देऊन भागणारे नाही तर रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी भाईंदर ते मुंबई आणि ठाणे या प्रवासासाठी रस्त्यांचे जाळे विणण्याचीदेखील गरज आहे. सध्या भाईंदर शहरातून बाहेर पडण्यासाठी केवळ भाईंदर काशी-मीरा हा एकमेव मार्ग आहे. शहराच्या सर्व वाहनांची गर्दी याच रस्त्यावर होत असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी गोल्डन नेस्ट, कनाकिया नाका, एस के स्टोन नाका आणि क्वीन्स पार्क नाका ही वाहतूक कोंडीची नवी ठिकाणे निर्माण होऊ लागली आहेत. वाहतुकीवरचा हा ताण कमी करण्यासाठी भाईंदर पश्चिम ते दहिसर आणि मीरा रोड पूर्व ते दहिसर हे रेल्वे समांतर रस्ते प्रस्तावित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 12:48 am

Web Title: mira bhayander road transport system water transport system in mira bhayander metro in mira bhayander
Next Stories
1 परीक्षार्थीकडून पाच लाख उकळले
2 करचुकवेगिरीप्रकरणी दोघांवर गुन्हा
3 मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह छायाचित्राविरोधात गोंधळ
Just Now!
X