मीरा-भाईंदर शहरात जास्तीत जास्त चाचण्यांचे प्रयत्न

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : रुग्णांच्या संपर्कात आलेल्या, त्याचप्रमाणे संशयित रुग्णांची करोना चाचणी केल्यास सरासरी ३३ टक्के रुग्णांचा अहवाल सकारात्मक येत असल्याचे वैद्यकीय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात अधिकाधिक चाचण्या करून करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. मंगळवारी समोर आलेल्या अहवालानुसार एकूण ६ हजार ८३४ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे, तर २३३ रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. राज्य शासनाकडून टाळेबंदी शिथिलतेनंतर शहरातील रुग्णवाढीचा वेग वाढला असल्यामुळे पुन्हा महानगरपालिकेमार्फत टाळेबंदी करण्यात आली होती. परंतु टाळेबंदी करूनदेखील रुग्णसंख्या कमी न झाल्यामुळे विरोधानंतर प्रतिबंधित क्षेत्रांतच टाळेबंदी ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेकडून प्रति दिवस ७०० ते ८०० करोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे ३३ टक्के रुग्णांचा अहवाल सकारात्मक येत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

मीरा-भाईंदरमधील करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता ‘चेस द व्हायरस’ मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे संपर्कातील आणि संशयित रुग्णांना पालिकेच्या अलगीकरण कक्षात आणले जाऊन त्याची करोना तपासणी करण्यात येत आहे. प्रति दिवस साधारण ७०० ते ८०० चाचण्या करण्यात येत आहेत. त्यापैकी ३३ टक्के म्हणजे साधारण १५० रुग्ण सकारात्मक  येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोठय़ा प्रमाणात करोना चाचण्या

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा अहवाल ३३ टक्के सकारात्मक येत असल्यामुळे करोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अशा अधिकाधिक व्यक्तींचा शोध घेऊन चाचणी करण्यात येत आहे. तसेच जलद अहवाल प्राप्त होण्यासाठी महानगरपालिकेला राज्य शासनाकडून अँटिजेन डिटेक्शन किट उपलब्ध करण्यात आल्यामुळे प्रति दिवस मोठय़ा संख्येने करोना चाचण्या करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.