ठेकेदाराला २ कोटी मंजूर; तरी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास टाळाटाळ

भाईंदर : गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असलेली परिवहन सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. करोनाकाळात महापालिकेकडून दोन कोटी रुपये देऊनही कंत्राटदाराने पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नसल्याचे समोर आले आहे.

करोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यापासून मीरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद करण्यात आली आहे. परिवहन सेवा खसगी तत्त्वावर चालविण्यात येत असून याचा ठेका भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या कंपनीला दिला आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवा चालविण्याकरिता ठेकेदारास प्रति किलोमीटर ४२ रुपये यांप्रमाणे मोबदला देत आहे. मात्र मार्च महिन्यापासून करोनाच्या साथीमुळे परिवहन सेवा ठप्प ठेवण्यात आली आहे.

या परिस्थितीत महापालिकेकडून ठेकेदाराला दोन टप्प्यांत साधारण २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परंतु तरीदेखील ठेकेदाराकडून ९० टक्के कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपसून पगार न दिल्याचे आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहेत. विशेष म्हणजे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात पूर्वीपासून वादात असलेल्या ठेकेदारास राजकीय दबावामुळे कंत्राट देण्यात आल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहेत. परिवहन विभागातील गोंधळ चव्हाटय़ावर आल्याने प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळासह कर्मचारी आणि  कंत्राटदाराची बैठक घेण्यात आली असून येत्या काही दिवसांतच परिवहन सेवा चालू करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना पगार न दिल्यास येत्या काळात कारवाई म्हणून कंत्राटदाराची आगाऊ  रक्कम थांबवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.