लघू पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठय़ाचे नवे धोरण गुंडाळले; पूर्वीचे वेळापत्रक लागू
लघू पाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्य़ाच्या आखलेल्या नव्या पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकाने पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने हे धोरण अवघ्या एकाच आठवडय़ात गुंडाळावे लागले आहे. आता मीरा-भाईंदरसह इतर महापालिकांनाही पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
पाणीकपातीदरम्यान जिल्ह्य़ातल्या महापालिका वेगवेगळ्या दिवशी पाणी उचलत असल्याने समान पाणीवाटप होण्यासाठी सर्व महापालिकांचे पाणी शनिवार व रविवार या दोन दिवशी बंद ठेवण्याचे धोरण लघू पाटबंधारे विभागाने घोषित केले. यासाठी धरणातूनच उल्हास नदीत पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या धोरणाचा परिणाम उलटाच झाला. शनिवार व रविवार दोन दिवस नदीत पाणीच शिल्लक राहात नसल्याने सोमवारी धरणातून पाणी सोडल्यानंतर ते नदीत पोहोचेपर्यंत व योग्य पातळी गाठेपर्यंत बराच अवधी लागत असे. त्याचा फटका जिल्ह्य़ातल्या महापालिकांना बसू लागला. त्यामुळे शनिवार व रविवार हे दोन दिवस पाणी मिळतच नव्हते, शिवाय सोमवारीही पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊ लागला. मीरा-भाईंदरला तर याची सर्वाधिक झळ बसली.
इतर महापालिकांच्या तुलनेत मीरा-भाईंदर हे पाण्याच्या स्रोतापासून सर्वात शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरला त्याचा परिणाम मंगळवापर्यंत जाणवू लागला. पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढवणारे धोरण रद्द करावे, अशी जोरदार मागणी होऊ लागली. त्यामुळेच लघू पाटबंधारे विभागाला केवळ एकाच आठवडय़ात हे धोरण मागे घ्यावे लागले आहे. आता पूर्वीप्रमाणेच प्रत्येक महापालिकेला पाणीकपातीचे वेगवेगळे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. मीरा-भाईंदरलाही स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सोमवारी रात्र ते बुधवारी रात्र असा बंद ठेवण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र एमआयडीसीकडून मीरा-भाईंदरला होणाऱ्या पाणीकपातीचे दिवस गुरुवार व शुक्रवार असल्याने स्टेमनेदेखील याच दिवशी पाणी बंद करावे, अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आली. त्यामुळे आता दोन्ही ठिकाणांहून मिळणारे पाणी गुरुवारी व शुक्रवारी बंद राहणार आहे.
या वेळापत्रकानुसार स्टेमच्या पाणीकपातीमधून सवलत देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी याआधी घेतला होता. मात्र लघू पाटबंधारे विभागाच्या नव्या धोरणाने ही सवलत आपोआपच रद्द झाली होती. मात्र आता लघू पाटबंधारे विभागाने आपले फसलेले धोरण मागे घेतल्याने जलसंपदामंत्र्यांनी दिलेली पाणीकपातीची सवलत पुन्हा लागू होते का याकडे मीरा-भाईंदरच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.