मीरा रोडमधील गणेश मंडळाचे आवाहन; जमा झालेले शैक्षणिक साहित्य आदिवासी विद्यार्थ्यांसाठी

गणपती ही बुद्धीची देवता असल्याने गणेशोत्सवाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांना बुद्धी ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य जमा करण्याचा अनोखा संकल्प सोडला आहे मीरा रोडमधील न्यू म्हाडा गृहसंकुलातील रहिवाशांनी. गणपतीला हारतुरे नकोत, फक्त एक वही-पेन द्या, असे आवाहन करत म्हाडामधील या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आतापर्यंत शेकडो वह्य़ा व पेन जमा केले आहेत. आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमासोबतच मंडळाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी यंदा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

गणेशोत्सवादरम्यान मोठय़ा प्रमाणावर निधी जमा होत असतो. हा निधी अनेक वेळा मौजमजा, धांगडधिंगा यांवरच खर्च होत असतो. त्यामुळे काही तरी वेगळे समाजोपयोगी काम करण्याचा निर्णय मीरा रोडच्या न्यू म्हाडा संकुल गणेशोत्सव मंडळाने घेतला.

यंदाचा मंडळाचा दुसरा गणेशोत्सव, या वेळच्या उत्सवाची संकल्पनाच साक्षरता, पर्यावरण, स्वच्छता आणि मुलींचे रक्षण या चार मुद्दय़ांवर आधारित ठेवण्यात आली. दर्शनाला येताना बाप्पासाठी हारतुऱ्यांवर खर्च करू नका, तर त्या पैशात किमान एक वही व एक पेन खरेदी करा आणि तोच बाप्पाचा प्रसाद समजून दान करा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

भक्तांकडून चांगला प्रतिसाद

आतापर्यंत दान स्वरूपात आलेल्या वह्य़ा व पेन यांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे, तर विसर्जनापर्यंत ही संख्या दोन हजारांच्या आसपास जाईल, असा विश्वास मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. वह्य़ा व पेन यासोबत भक्तांकडून अन्य शैक्षणिक साहित्यही भक्तांकडून दान स्वरूपात मिळत आहे.