रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कुटुंबिय शोकसागरात बुडालेले असतात. अशावेळी रुग्णालयाने त्या कुटुंबाला जास्त त्रास होणार नाही यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. पण मीरा रोड येथील भक्तीवेदांत रुग्णालयाने चक्क मृतदेहांचीच अदलाबदल करुन शेट्टी कुटुंबाला मनस्ताप दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

मीरा रोड येथे रहाणाऱ्या शेट्टी कुटुंबातील भुजंगा शेट्टी (७०) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी भक्तीवेदांत रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर शेट्टी यांच्या घराबाहेर कुटुंबिय आणि मित्र परिवार जमला. सर्वजण अंत्यसंस्कारासाठी भुजंगा शेट्टी यांच्या मृतदेहाची वाट पाहत थांबलेले असताना रुग्णालयाने चक्क दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

मृतदेहाच्या बाबतीत इतकी गंभीर चूक घडल्यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर रुग्णालयाने दुसऱ्या रुग्णवाहिकेतून भुजंगा शेट्टी यांचा मृतदेह पाठवला व दुसऱ्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह परत घेऊन गेले. रुग्णालयाने मृतदेह सोपवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या एका कर्मचाऱ्याला निलंबित केले असून रुग्णालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

सामान्यत: शवागरामध्ये उपस्थित असलेले कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवतात. पण भक्तीवेदांत रुग्णालयात त्यावेळी शवागरमध्ये डयुटीवर असणारे कर्मचारी अनंत शंकर सावंत यांनी या नियमाचे पालन केले नसावे अशी शक्यता आहे. आमच्या रुग्णालयात यापूर्वी असे घडलेले नाही. या चुकीसाठी काही स्पष्टीकरण असू शकत नाही. आम्ही सावंत याला निलंबित केले आहे असे रुग्णालयाचे संचालक डॉ. अजय संखे यांनी सांगितले.

मृतदेह घरी येईपर्यंत पूर्णपणे झाकलेला होता. मृतदेह घरी आल्यानंतर शेवटचे पाहता यावे यासाठी आम्ही कपडा बाजूला केला तेव्हा समोर दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह पाहून आम्हाला धक्काच बसला असे भुजंगा यांच्या मुलाने सांगितले. भुजंगा शेट्टी यांना २५ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी मंगळवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.