रेल्वे स्थानके, बस स्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल, दुकाने आणि रस्त्यावर भीक मागणारी लहान मुले यांच्याशी सुसंवाद साधत त्यांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठवण्याचा उपक्रम पोलीस विभागाकडून राबवण्यात आला होता. एप्रिल महिन्यामध्ये राबवण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील सुमारे ८८ मुलांना यशस्वीपणे स्वगृही सोडण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातून सुमारे ७७ जणांची तर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून ११ जणांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यात आली. त्यामुळे या मुलांच्या पालकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांच्या या कामगिरीचे आभार मानले आहेत.
घराबाहेर खेळण्यासाठी गेलेला मुलगा परत आला नाही, आई-वडिलांचा ओरडा मिळाल्याने घर सोडून गेलेली मुले आणि घरातून अपहरण झाल्याने घरापासून दुरावलेली मुले या सगळ्या मुलांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने ‘ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत पोलीस दलाच्या वेगवेगळ्या पथकांनी शहरातील अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत केली. या मोहिमेत ठाणे पोलीस आयुक्तालय ठाणे शहराअतंर्गत येणारे सगळे कक्ष आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने शहरातील अशा मुलांचा शोध घेण्यात आला. पोलिसांची ३४ पथके त्यासाठी कार्यरत करण्यात आली होती. या मोहिमेतून १८ र्वष वयोगटापर्यंतच्या मुलांचा शोध घेण्यात आला. अपहरण झालेली ३२ मुले व १० मुली अशा एकूण ४२ मुलांचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे. तसेच हरवलेली ७ जण, बेवारस फिरणारा १ मुलगा व २ मुली अशा १० जणांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. तर बालसुधारगृहात असलेल्या २४ मुले व १ मुलगी अशा २५ जणांना समुपदेशन करून त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती आधारे त्यांच्या घराचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले. अशा प्रकारे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ७७ जणांना स्वगृही धाडण्यात पोलिसांना यश मिळाले. ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

ठाणे ग्रामीण भागातील ११ मुले सुखरूप..
ठाणे ग्रामीण जिल्ह्य़ातून गेल्या पाच वर्षांत ३९ मुले व ४८ मुले असे ८७ मुले हरवल्याची माहिती स्पष्ट झाली होती. ही माहिती आपरेशन मुस्कान मोहिमेतील पथकाकडे देण्यात आली होती. त्यानुसार या मोहिमेतून सुमारे ३४ मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ठाणे ग्रामीण जिल्ह्य़ातून हरवलेल्या ३ मुले व ८ मुली असे ११ जणांना त्यांच्या कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले. ठाणे ग्रामीण जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.