पोटापाण्यासाठी दाही दिशा निरनिराळ्या ठिकाणी स्थलांतरित होऊन राहावे लागले असल्याने अनेक कुटुंबे विभक्त होऊन एकमेकांपासून दुरावतात. ठाण्यात चार दशकांपूर्वी अशाच प्रकारे दुरावलेल्या एका महाराष्ट्रीय कुटुंबातील चुलत भावंडांची गेल्या महिन्यात पुनर्भेट झाली. त्या सर्व नाटय़मय घडामोडीचे साक्षीदार ठरलेल्या बळवंत कर्वे यांचे हे अनुभवकथन..
गेल्या महिन्याच्या अखेरीस ३० मे रोजी भरदुपारी एक वाजता आर. पी. रामनाथन नावाची एक अपरिचित व्यक्ती मला भेटायला आमच्या घरी आली. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील रहिवासी असलेली ही व्यक्ती व्यवसायाने वकील आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव पुरुषोत्तम रामचंद्र कर्वे असे सांगतले आणि मला आश्चर्य वाटले. त्यांच्या आजोबांचे नाव रामचंद्र गणेश कर्वे, तर पणजोबांचे नाव गणेश कृष्णाजी कर्वे असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यांचे पणजोबा आणि आजोबा रामेश्वरच्या
सुप्रसिद्ध शिवमंदिराचे प्रमुख पुजारी होते, असेही कळले.
रामनाथन यांना मराठी बोलता येत नव्हते, पण थोडेफार कळत होते. त्यामुळे आमचे सर्व संभाषण इंग्रजीतूनच सुरू होते. त्यांचे काका कृष्णाजी रामचंद्र कर्वे हे ठाण्यातील चरईमध्ये सातरहाटी विहीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात काही वर्षांपूर्वी राहत होते. १९७० मध्ये रामनाथन वडिलांसोबत काकांकडे आले होते. त्या काकांना दोन मुले- प्रमोद व शरद तसेच दोन मुली शांता व शकुंतला असल्याचेही त्यांनी सांगितले. १९७३ मध्ये वडिलांचे निधन झाल्यावर रामनाथन कर्वे यांचा ठाण्यातील काकांच्या कुटुंबाशी असलेला संपर्क तुटला. रामनाथन यांना मात्र अधेमधे ठाण्याला जाऊन आपल्या चुलत भावंडांची भेट घ्यावी, असे वाटत होते. मात्र चाळीस वर्षांत तसा योग आला नव्हता. अखेर गेल्या महिन्यात त्यांनी ठाणे गाठले. सोशल मीडियावर संपर्कात
असलेल्या अमेय कर्वेकडून त्याला माझा पत्ता मिळाला.
कर्वे कुलसमितीच्या कार्यात मी सुरुवातीपासून कार्यरत आहे. त्याचे काकाही ठाण्यात राहत होते. त्यामुळे सहाजिकच त्यांचे कुटुंबीय शोधण्यात मी त्याला मदत करावी, अशी त्याची अपेक्षा होती. रामनाथनची त्याच्या चुलत भावंडांना भेटण्याची इच्छा पाहून मी भारावून गेलो. काहीही करून तुम्हा भावंडांची भेट घडवून आणेन, असे मी त्याला सांगितले.
दुपारची वेळ असल्याने पोटपूजा करून मी त्याच्याबरोबर सातरहाटी विहीर असलेल्या भागात गेलो. अर्थातच आता तो परिसर पूर्णपणे बदलला आहे. त्याचे काका राहायचे, त्याजागी आता एक बहुमजली इमारत उभी आहे. या इमारतीत तळमजल्यावर राहत असलेल्या गद्रे कुटुंबाकडून इथे पूर्वी एक कर्वे कुटुंब राहत असल्याचे समजले. तिथेच असणाऱ्या ८० वर्षांच्या वझे आजींकडून कर्वे कुटुंबाची थोडी माहितीही मिळाली.
तसेच तिथे त्या वेळी राहणाऱ्या बर्वे कुटुंबातील मुलगी (विवाहानंतरचे नाव ज्योती कर्वे) कल्याणला राहत असल्याचे कळले. त्या कर्वे कुल समितीच्या सभासद असल्याने माझ्या परिचित आहेत. मी त्यांच्याशी त्वरित संपर्क साधून या कर्वेविषयी काही माहिती असल्यास कळवावी, असे सांगितले.
त्यांनी वझे आजींच्या मुलाशी संपर्क साधून रामनाथनच्या धाकटय़ा चुलत बहिणीचा- वैशाली पेठे हिचा ठाण्यातील पत्ता काही तासातच मला कळविला. त्याचप्रमाणे रामनाथन याच्या दुसऱ्या चुलत बहिणीची मी त्याच दिवशी संध्याकाळी आठ वाजता भेट घेतली व दूरध्वनीद्वारे रामनाथचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. ती भावंडे फोनवर चार-पाच मिनिटे बोलली.
दुसऱ्याच दिवशी ३१ मे रोजी रामनाथन माझ्याकडे आला. योगायोग म्हणजे त्याच दिवशी वैशाली पेठे यांचे किडनी स्टोनचे ऑपरेशन होते. त्यामुळे त्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात होत्या. ठरल्यानुसार रामनाथन मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्याकडे आला. मी त्याला गोडबोले हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सव्वासहा वाजता या दोन भावा-बहिणींची तब्बल ४५ वर्षांनंतर पुनर्भेट झाली. त्यांचे ते आवेगपूर्ण संभाषण मी दुरूनच अनुभवले. इतक्या वर्षांनंतर कुटुंबातील सदस्य भेटल्यामुळे त्यांना आनंद झालाच, पण त्यापेक्षा अधिक समाधान मला वाटले. रुग्णालयात असल्याने १५ मिनिटांत संभाषण आवरते घ्यावे लागले. पुन्हा सर्व भावंडांनी भेटायचे ठरले.
त्यानंतर ही रामनाथन यांची अधिक माहिती घेतली. रामनाथन याची पहिली आई महाराष्ट्रीय जोशी कुटुंबातील होती. मात्र दीड वर्षांतच तिचे निधन झाले. त्यांचे वडील भिक्षुकी करीत. १९४७ च्या सुमारास त्यांनी केरळमधील नंबुद्रीपाद ब्राह्मण कुटुंबातील स्त्रीशी विवाह केला. त्यानंतर १९४९ मध्ये रामनाथनचा जन्म झाला. सेतुरामन आणि दुर्गासुंदरी ही त्याची भावंडे. धाकटय़ा भावाचे लग्न होईपर्यंत हे कुटुंब एकत्र होते. पुढे १९६८ मध्ये आईचे तर १९७३ मध्ये वडिलांचे निधन झाले. सध्या कोईम्बतूरमध्ये ही तिन्ही भावंडे स्वतंत्रपणे राहत आहेत..
बळवंत कर्वे