24 February 2021

News Flash

पोलिसाच्या मदतीने ‘ती’ सुखरूप घरी

उत्तर प्रदेशात राहणारी अंजली चौधरी (१५) या मुलीला इतरांप्रमाणे मायानगरी मुंबईचे आकर्षण होते.

पोलीस उपनिरीक्षकामुळे हरवलेली मुलगी सापडली.

मायानगरीत हरवलेल्या मुलीला शोधण्यास यश

रेल्वे स्थानके ही गर्दीच्या ठिकाणांत गणली जातात. हजारो प्रवाशांच्या गर्दीतून एखाद्या व्यक्तीचा चेहरा वा त्यावरील भाव ओळखणे हे कोणासाठीही कठीण काम असते. पण रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याने या गर्दीत हरविलेल्या एका मुलीचा हुंदका ऐकला आणि घर हरवलेली ही मुलगी पुन्हा आपल्या घरी सुखरूप पोहोचली. मागील महिन्यात अशाच एका मुलीच्या हुंदक्याने एका मोठय़ा सेक्स रॅकेटचा गुन्हा उघडकीस आला होता. या प्रकरणात असा प्रकार सुदैवाने न घडल्याने सुरक्षा बलासह मुलीच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला.

उत्तर प्रदेशात राहणारी अंजली चौधरी (१५) या मुलीला इतरांप्रमाणे मायानगरी मुंबईचे आकर्षण होते. महिन्याभरापूर्वी ती विरारला बहिणीकडे आली. मुंबईत राहून स्वत:च्या पायावर उभे राहायचे, ग्लॅमरस दुनियेत नाव कमवायचे असे तिचे स्वप्न होते. विरारमधील बहिणीकडून काही मदत मिळू न शकल्याने भल्या पहाटे तिने मोठय़ा हिमतीने घर सोडले, पण गर्दीने ती बावरली आणि स्वत:ला हरवून बसली. सलग बारा तास ती विविध रेल्वे स्थानकांत भटकत होती. अखेर हिंमत हरली. भटकता भटकता ती नालासोपारा रेल्वे स्थानकात आली आणि हताशपणे एका ठिकाणी बसून हुंदके देत रडू लागली. संध्याकाळची वेळ होती. त्या वेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ती दिसली. तिची वागणूक, तिच्या चेहऱ्यावरील भाव यावरून ती भेदरलेली असल्याचा त्याला संशय आला. त्याने या मुलीला येथील कार्यालयात नेले. सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक शर्मा यांनी तिची कसून चौकशी केली आणि एकंदरीत सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन माहिती घेतली आणि तिने सांगितल्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील तिच्या नातेवाईकांकडे संपर्क केला आणि तिला सुखरूप तिच्या घरी पोहोचवले. जर आमच्या कर्मचाऱ्याची नजर तिच्यावर पडली नसती तर ती चुकीच्या व्यक्तीच्या सान्निध्यात गेली असती आणि कदाचित वाईट मार्गाला तिला लावण्यातही आले असते, परंतु सुदैवाने ती आमच्या दृष्टिक्षेपात आल्याने तिचे आयुष्य सावरले, असे नालासोपारा रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख पोलीस निरीक्षक ए.के. राय यांनी सांगितले.

मागील महिन्यात वसई रेल्वे स्थानकात एका रेल्वे पोलिसाने एका तरुणाबरोबर एका अल्पवयीन मुलीला पाहिले होते. ही मुलगी रडत असल्याचे त्याला दिसले. त्याला संशय आला आणि त्याने चौकशी केली. त्या वेळी या मुलीला बांगलादेशातून देहविक्रीसाठी पळवून आणल्याचे समजले. या प्रकरणात मोठे सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणात एका तरुणीसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली.

अनेक मुलींना अशा प्रकारे पळवून मुंबईत देहविक्रीच्या व्यवसायात आणले जाते. बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली तर मोठे अनर्थ टळू शकतात, असे या दोन घटनांवरून सिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:17 am

Web Title: missing girl back home with help of police
Next Stories
1 समाजमाध्यमांवर नृत्यांगनेच्या रांगोळीचा गाजावाजा
2 अल्पवयीन मुलावर  लैंगिक अत्याचार
3 रेल्वे स्थानके फेरीवालेमुक्त!
Just Now!
X