24 September 2020

News Flash

शाळेच्या बाकावरून : ध्येय आदिवासी मुलांच्या विकासाचे!

योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचे हे विचार वाचल्यावर योग विषयाची महती कळून येते. योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योगशास्त्राचा

| June 23, 2015 05:44 am

tvlogI wish that message of peace may be experienced through yoga which is not only the culture of the body but evolution of the self.
योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचे हे विचार वाचल्यावर योग विषयाची महती कळून येते. योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योगशास्त्राचा अधिकाधिक प्रसार व्हावा, जनसामान्यांनी हे शास्त्र समजून आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा व्यापक हेतूने २१ जून हा दिवस योग दिन म्हणून प्रथमच देशभर साजरा करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर अंबरनाथ तालुक्यातील (बोराडपाडा रोडवरील) लव्हाळी गावातील शिवभक्त आदिवासी आश्रमशाळेने साऱ्या समाजासमोर उदाहरण घालून दिले आहे. गेली १२ वर्षे या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाचा प्रारंभ हा सूर्यनमस्कार (१२) आणि योगासनांनी होतो. दरवर्षी रथसप्तमी ते रथसप्तमी या कालावधीत एक लक्ष सूर्यनमस्काराचे उद्दिष्ट ५ वी ते १० वीचे विद्यार्थी साध्य करतात, ही गोष्ट विशेषत्वाने नमूद करण्याजोगी!
लव्हाळी गाव आणि आजूबाजूचा भाग हा डोंगराळ आणि पूर्णपणे आदिवासी वस्तीचा. या भागात चौथीपर्यंतच शिकण्याची सोय होती आणि पुढील शिक्षणासाठी १६ कि.मी. लांब बदलापूरला जावे लागे. रोजचे जगणेच संघर्ष असलेल्या येथील आदिवासींना खासगी शाळा परवडणे शक्य नव्हते. त्यामुळे शिक्षणाची समस्या बिकट होती. मुली तर शिकत नव्हत्या. परिणामी लहान वयातच मुलींची लग्ने होत असत. येथील समाजाची निकड लक्षात घेऊन गुरुवर्य नानासाहेब सबनीस शिक्षण संस्थेतर्फे लव्हाळी गावात शिवभक्त आदिवासी आश्रमशाळेची १९९९ साली स्थापना करण्यात आली, ३० ते ३५ मुलांना घेऊन. घरी शिक्षणासाठी पोषक वातावरण नसल्याने मुलांमध्ये प्रयत्नपूर्वक अभ्यासाची आवड निर्माण करावी लागते. आपले आणि त्यांचे जीवन भिन्न असल्याने भाषा, खाणे, चालीरीती यात खूप तफावत जाणवते. वर्षभराचे आपले सणही त्यांना नवीनच असल्याने आवर्जून साजरे केले जातात. त्यांना आवडणारे पावभाजी, मिसळ इ. पदार्थ आवर्जून करताना त्यांच्या पद्धतीचा चहा व बटर देऊनही त्यांची आवड जोपासली जाते. त्यांना मॉल, वॉटर पार्क, नेहरू सेंटर येथे आवर्जून सहलीसाठी नेले जाते.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून शाळेच्या व्हरांडय़ात ‘माझ्याकडे पाहा!’ या खुल्या वाचनालयांतर्गत पुस्तकाचे दोन स्टॅण्ड ठेवले जातात. जाता-येता मुलांना ही पुस्तके सहज दृष्टीस पडतात आणि कुतूहल जागृत होऊन ती पुस्तके चाळतात. इंग्रजी भाषेसाठी शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागते. या मुलांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे लागते. त्यांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून खूप मेहनत घ्यावी लागते. दरवर्षी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते; पण सूर्यनमस्कार व योगासने घालण्याच्या सातत्यामुळे या मुलांना आजारपण माहीत नाही.
१० वीच्या दृष्टीने या शाळेत विशेषत्वाने प्रयत्न केले जातात. १ एप्रिल ते ५ मे या काळात रोज ९ ते १ या कालावधीत अतिरिक्त अभ्यास घेतला जातो. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी ८ ते १० या वेळेत अधिक अभ्यास घेतला जातो.  शहरी मुले आणि आदिवासी मुले यांना एकत्र आणण्यासाठी शाळेची सुरुवात झाली आणि आज या शाळेत ४२५ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये १९० मुली आहेत ही गोष्ट विशेष अभिमानाची!  शाळेत १२ शिक्षक, ११ कर्मचारी आणि २ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. प्रा. रमेश आणि सायली बुटेरे दाम्पत्य यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शालान्त परीक्षेच्या निकालात या शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. भारती निरगुड या विद्यार्थिनीला ७९.८० टक्के गुण मिळाले आहेत व ती शाळेत पहिली आली आहे.
या शाळेचा परिसर अतिशय प्रसन्न आहे. पायऱ्या चढून आत गेल्यावर शाळेची तीन बाजूंनी इमारत आणि मध्यभागी पटांगण असे दृश्य दिसते. एका बाजूला विद्यार्थ्यांचे वसतिगृह, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थिनींचे वसतिगृह. त्याच्या बाजूला छोटेसे उद्यान आणि आवारात दिसणारे हिरवे वृक्ष! एका वाफ्यामध्ये विद्यार्थ्यांनी फुलवलेल्या भाजीच्या मळ्यात वांगी, दुधी, अळू, मिरची अशा भाज्या पाहायला मिळतात. या मुलांसाठी ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष या सोयीदेखील उपलब्ध आहेत.
या निवासी आश्रमशाळेतील मुले सकाळी ६ वाजता उठतात. ६.३० ते ७.३० या वेळेत १२ सूर्यनमस्कार आणि योगासने दररोज करतात. १० ते ५ या वेळेत शाळा भरते. पहिल्या अर्धा तासाच्या परिपाठात प्रार्थना, मनाचे श्लोक, देशभक्तिपर गीते शिकवली जातात. विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचून दाखविले जाते. शाळा संपल्यानंतर मुले वैयक्तिक कामे करून थोडा वेळ त्यांच्या मनोरंजनासाठी असतो.  या मुलांच्या घरी बुटेरे सर गेली ६ वर्षे शिबिराचे आयोजन करीत आहेत. त्याचबरोबर या शाळेत दरवर्षी एनएसएसचे निवासी शिबीरही आयोजिले जाते. या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा, क्रीडा स्पर्धा यांचाही अनुभव दिला जातो.
इंग्रजी माध्यम/ सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई./ इंटरनॅशनल स्कूल, असा ठाणे शहराच्या एका वर्गाचा प्रवास सुरू आहे, तर आदिवासींना शिक्षण मिळणे दुरापास्त असते ही वस्तुस्थिती आहे. चौथीनंतरच्या शिक्षणासाठी १६ किमी लांब बदलापूरला जायचे, हे वास्तव मन अस्वस्थ करते. (आपल्याजवळील अंबरनाथमध्ये ही परिस्थिती होती.) आज या पाश्र्वभूमीवर शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा ही मुरबाड, अंबरनाथ, कर्जत या ३ तालुक्यांतील आदिवासी पाडय़ांसाठी आशेचा किरण ठरली आहे. स्वत: प्राध्यापक असलेल्या बुटेरेसरांनी ती प्रयत्नपूर्वक नावारूपाला आणली आहे. (म्हणूनच ती बुटेरेसरांची शाळा अशी प्रसिद्ध आहे.) येथील मुलांनी म्हटलेले पसायदान, देशभक्तिपर गीते ऐकल्यावर आपण खरोखरच थक्क होतो. आपले स्वागत करणाऱ्या वेगवेगळ्या लयीतल्या टाळ्या आणि शिट्टय़ा प्रत्यक्ष अनुभवाव्यात अशाच! अत्यंत स्वच्छ, नीटनेटकी शाळा आणि शिस्तबद्धरीतीने आपल्या कलागुणांचा परिचय देणारे विद्यार्थी यांना सर्वानी एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
हेमा आघारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 5:44 am

Web Title: mission for tribal students development
Next Stories
1 ठाणे.. काल, आज, उद्या
2 बेकायदा चाळींचा खाडीकिनारी पूर
3 विद्यार्थी दीडशे, शिक्षक मात्र एकच!
Just Now!
X