पालिका प्रशासन, पोलिसांच्या दुर्लक्षावर टीका

डोंबिवली : डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी याचा दोष पालिका आयुक्त आणि पोलिसांवर ढकलला आहे. ‘फेरीवाल्यांना हटवणे जमत नसेल तर अन्यत्र बदली करून घ्या,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांना सुनावले आहे. तर, फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्याबद्दल त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावरही नाराजी व्यक्त केली.

डोंबिवली परिसरातील अव्यवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, फेरीवाल्यांचा उपद्रव, वाढते प्रदूषण अशा मुद्दय़ांवर विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण टीकेचे लक्ष्य ठरले होते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीतून मोठय़ा मताधिक्याने निवडून येण्याचे स्वप्न बाळगणारे चव्हाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कडव्या लढतीचा सामना करावा लागला. निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत नाही तोच दिवाळीत डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण घडले. या पाश्र्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी थेट महापालिका आयुक्त गोंविद बोडके यांच्यावर निशाणा साधत नाराजी व्यक्त केली.

‘फेरीवाल्यांवर कारवाई करणे शक्य नसल्यास अन्यत्र बदली करून घ्या,’ अशी तंबी चव्हाण यांनी पालिका आयुक्त बोडके यांना दिली. ठाणे पोलिसांनी फेरीवाल्यांना हटविण्यासाठी ५० हून अधिक पोलीस बळ उपलब्ध करून दिले आहेत. हे पोलीस बळ अकार्यक्षम आहे, असेही ते म्हणाले. दिवाळीच्या दिवसात डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या दोन गटांत हाणामारी होत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निष्क्रियता दाखवल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

येत्या आठवडाभरात डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ, स्कायवॉक फेरीवाला मुक्त करण्यात आले नाहीत, तर आपण स्वत: रस्त्यावर फेरीवाल्यांना हटविण्यासाठी उतरू. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका, पोलिसांची असेल, असा इशारा चव्हाण यांनी आयुक्तांना दिला आहे.

शहरभर फेरीवाले

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुमारे दीड वर्ष डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसर ‘फेरीवालामुक्त’ होता. मात्र, आता येथे पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. फेरीवाल्यांना व्यवसायासाठी सार्वजनिक जागा भाडय़ाने देणारे दलाल सध्या सक्रिय झाले आहेत. तसेच व्यवसायासाठी फेरीवाल्यांना व्याजाने पैसेही पुरवण्यात येतात, अशी माहिती मिळते. काही फेरीवाले भर बाजारात कमरेला शस्त्रे लावून फिरत असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पालिकेच्या पथकाकडून त्यावर काहीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.