४० टक्के एमएमएलडी पाणीकपात करण्याचे संकेत
पुढील सात महिने पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कल्याण-डोंबिवली पालिकेने आपल्या दररोजच्या पाणीपुरवठय़ात तब्बल ६२ दशलक्ष लिटर पाणीकपात करावी, असे आदेश शासन पातळीवरून पालिकेला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हणजे पालिकेला दररोज जो ३०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. त्याऐवजी २३८ एवढाच पाणीपुरवठा उल्हास नदीतून केला जाईल. पालिका प्रशासन मात्र या सगळ्या हालचालींबाबत अनभिज्ञ आहे.
पालिका निवडणुकांमुळे पाणीकपातीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात चालढकलपणा करण्यात येत असला तरी निवडणुका संपताच शहरवासीयांना येत्या काळात पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यभरातील उपलब्ध पाणीसाठा आणि पुढील नऊ महिन्यांचे नियोजन याबाबतीत मंत्रालयात येत्या सोमवारी राज्यभरातील पालिका आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
लघु पाटबंधारे विभागाने धरणांमधील पाण्याची उपलब्धता आणि त्यासाठी कोणत्या शहराने किती पाणीकपात करावी याबाबतचे नियोजन शासनाला सादर केले आहे. त्यावरून कल्याण-डोंबिवली पालिकेवर ४० टक्के पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना दररोज सुमारे ३०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरण, आंध्र धरण हे पालिकेचे पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. पालिकेला पाणीपुरवठय़ाची अन्य सुविधा नसल्यामुळे कडोंमपाला येत्या काही दिवसांत पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पाणी चोरी, पाणी गळती. त्यात पाणीकपात सुरू होणार असल्यामुळे दहा वर्षांपूर्वीसारखी पाणीटंचाईवरून मोर्चे, उपोषणेसारखे प्रकार सुरू होणार असल्याचे चित्र सर्वसामान्यांच्या समोर तरळू लागले आहे.