News Flash

घारापुरीच्या लखलखाटाला अखेर मुहूर्त

विद्युतीकरणासाठी एमएमआरडीएकडून २० कोटींचा निधी मंजूर

विद्युतीकरणासाठी एमएमआरडीएकडून २० कोटींचा निधी मंजूर
मुंबई, ठाणेच नव्हे तर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या घारापुरी बेटांवरील अंधार आता खऱ्या अर्थाने दूर होण्याची चिन्हे आहेत. महावितरणने लावलेल्या चार जनरेटर्सच्या आधाराने दिवसात जेमतेम चार तास वीजपुरवठा होत असलेल्या या बेटाचे विद्युतीकरण कित्येक वर्षे कागदावर होते. मात्र आता या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मंजूर केला असून हा निधी महिनाभरात वीज वितरण कंपनीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर समुद्राखालून वीजवाहिनी टाकून घारापुरीला नियमित वीज उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, वीज वितरण यंत्रणेवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करत असताना या ठिकाणी सौर ऊर्जेद्वारे प्रायोगिक तत्त्वावर विद्युतपुरवठा उभारण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
कोरीव लेण्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या घारापुरी बेटाला पर्यटनदृष्टय़ा मोठे महत्त्व आहे. मात्र भौगोलिक कारणांमुळे विजेसह अनेक सुविधा येथे पोहोचू शकलेल्या नाहीत. या बेटाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे येथील पायाभूत सुविधांचे नियंत्रण आणि समन्वयाचे काम सोपविले आहे. या अनुषंगाने बेटावरील पाण्याची कमतरता दूर करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही काळात प्रयत्न केले जात आहेत. पर्यटनाच्या अंगाने भरपूर वाव असूनही या बेटांवर विजेची व्यवस्था नसल्याने येथील विकासाला मर्यादा पडू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून वीज वितरण कंपनीला वर्षांला २८ लाखांचे अनुदान देण्यात येते. या अनुदानाच्या आधारे या ठिकाणी चार जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. त्याद्वारे चार तासांचा मर्यादित असा विजेचा पुरवठा या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे घारापुरी बेट स्थानिक ग्रामस्थ आणि रहिवाशांसाठी असुविधांचे आगार ठरू लागले आहे.
घारापुरी बेटांवर २४ तास विजेचा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. वीज वितरण कंपनीने या बेटांवर विजेचा पुरवठा सुरू करण्यासाठी समुद्राखालून वाहिन्या टाकण्याचा आराखडा तयार करून सरकारला यापूर्वीच सादर केला आहे. या कामासाठी साधारणपणे १६ कोटी रुपयांचा खर्च येईल असा अंदाज आहे. वीज वितरण कंपनीने सादर केलेल्या आराखडय़ामुळे जागतिक वास्तुवारसा असलेल्या या बेटांवर विजेचा लखलखाट सुरू होईल, अशा स्वरूपाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी उभारणीचा मुद्दा प्रलंबित असल्याने समुद्राखालून वीज वाहिनी टाकण्याचा आराखडा कागदावर राहिला होता. अखेर उशिरा का होईना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यासंबंधीच्या सविस्तर प्रस्तावास मान्यता दिली असून सुमारे २० कोटी रुपयांचा निधी महावितरण कंपनीस वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महानगर प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, पर्यटन विभागामार्फत घारापुरी बेटांवरील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून त्यास लवकरच मंजुरी दिली जाणार आहे, असे पर्यटन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2016 1:51 am

Web Title: mmrda 20 crore fund for power generation
टॅग : Mmrda
Next Stories
1 दुष्काळग्रस्तांच्या पोटावर पाय?
2 निधीअभावी निळजे पूल टांगणीला!
3 ‘जि. प.’च्या शाळेतील विद्यार्थी इंग्रजी बोलणार
Just Now!
X