ब्लॉक, परवानग्यांचा विलंब टाळण्यासाठी रेल्वेकडून उभारणी

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने मार्गी लागावे यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या पुलाच्या रेल्वे हद्दीतील काम रेल्वेमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे हद्दीतील काम करताना इतर प्राधिकरणांपुढे नेहमीच अडचणींचा डोंगर उभा राहत असतो. कामाकरिता आवश्यक ब्लॉक, विविध परवानग्या तसेच रेल्वेच्या मानकांची पूर्तता मिळवण्यात बराचसा वेळ खर्ची पडतो. हा अनुभव लक्षात घेता मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यंदा ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला असून कोपरी पुलाच्या उभारणीसाठी तब्बल ९० कोटी रुपयांचा निधी रेल्वेकडे सुपूर्द करण्याचे ठरवले आहे. हे काम रेल्वेने केल्यास यातील बऱ्याचशा अडचणी दूर होतील, असा तर्क यामागे लढवण्यात आला आहे.

कोपरी पुलाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मेसर्स रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या संस्थेस १२४ कोटी ७७ लाख रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरी येथील रेल्वे ओलांडणी पूल जेमतेम दोन अधिक दोन मार्गिकांचा असून या नव्या कामात तो दोन्ही बाजूस चार मार्गिकांचा केला जाणार आहे. या आराखडय़ानुसार कामाच्या पहिल्या टप्प्यात अस्तित्वातील पुलाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन मार्गिकांच्या पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या नवीन बांधकाम केलेल्या पुलांवरून वाहतूक सुरू केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अस्तित्वातील पूल पाडून त्या ठिकाणी प्रत्येकी दोन मार्गिकांचा नवा पूल उभारण्याचे नियोजन आहे. रेल्वेच्या मानकांनुसार नव्या पुलाचे बांधकाम अस्तित्वातील रेल्वे रुळांच्या पातळीपासून ६.५२ मीटर इतक्या उंचीवर केले

जाणार आहे. हे काम करत असताना दोन्ही बाजूस असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांचे स्थलांतर करायचे नाही, असे नियोजन केले आहे.

रेल्वेकडे ९० कोटी जमा करणार

या पुलाचे बहुतांश काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत केले जाणार असले, तरी रेल्वे हद्दीतील काम रेल्वेकडूनच करून घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गास सोयीस्कर ठरले अशा पद्धतीने दोन्ही बाजूंकडे चार मार्गिकांची उभारणी करत असताना पुलाच्या उभारणीचे बरेचसे काम रेल्वे हद्दीत केले जाणार आहे. हे काम करण्यासाठी रेल्वेकडून वारंवार ब्लॉक्स घ्यावे लागणार असून रेल्वेची सुरक्षा मानके तसेच रेल्वेवाहिन्यांची आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे काम रेल्वेने करावे, असा प्रस्ताव मध्यंतरी प्राधिकरणाने रेल्वेपुढे मांडला होता. रेल्वे हद्दीतील कामे पूर्ण करताना वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे कामास विलंब होतो, असा अनुभव आहे. त्यामुळे हे काम रेल्वेने केल्यास बराचसा विलंब टाळता येईल, असा दावा एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. रेल्वे हद्दीतील कामासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च येणार असून ही रक्कम रेल्वेकडे जमा केली जाणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. कोपरी पुलाच्या उभारणीचे काम सुरू होताच रेल्वे हद्दीतील कामेही सुरू व्हावीत, अशी अपेक्षा रेल्वेकडे व्यक्त करण्यात आली आहे.